जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर परिसरात मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्या अंतर्गत विविध गुन्ह्यातील १५ फरार संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी, लालगोटा आणि हलखेडा या गावांमध्ये कोंबिंग ऑपरेशन यशस्वीपणे राबवले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोठ्या कारवाईत एका पोलीस निरीक्षकासह चार सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, १३० पोलीस अंमलदार आणि आर.सी.पी. पथकांनी सहभाग घेतला.

कारवाईदरम्यान, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार संशयित कमलेश्वर ज्ञानेश्वर पाटील (४५) आणि दीपमाला कमलेश पाटील (३८, दोघे रा. मधापुरी) यांना ताब्यात घेण्यात आले. याशिवाय, यापूर्वी चोरीसह दरोडा सारख्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या १३ संशयितांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये रोहित ऊर्फ गुरुदास सुदेश पवार (२५), क्रिश निशांत पवार (१९), किसन दिनू पवार (२१), नितेश रितेश पवार (३०), आर्यमन जिन्नू पवार (१९) आणि गिता नागेश पवार (३८, सर्व रा. मधापुरी) तसेच धरमसिंग लखनसिंग भोसले (२५), लखनसिंग युवराज भोसले (५०), बाबुसिंग लखनसिंग भोसले (१९), टोनी दर्शनलाल पवार (४३), लकी टोनी पवार (२२), सदानंद टोनी पवार (२५, रा. लालगोटा) आणि नयन सटा भोसले (२५, रा. हलखेडा) या संशयितांचा समावेश आहे.

८२ तडीपार गुन्हेगारांची चौकशी

जळगाव पोलीस दलाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरात नुकतेच नाकाबंदीसह ऑल आऊट ऑपरेशन देखील राबवले. या मोहिमेत २६९ पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते. विशेष मोहिमेदरम्यान २,४५८ वाहनांची कसून तपासणी तसेच ८२ तडीपार गुन्हेगारांची सखोल चौकशी करण्यात आली. जिल्हाभरात १६० पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ज्यामध्ये दारूबंदी कायद्यान्वये ९०, जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये ३४, शस्त्र कायद्यान्वये एक तर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये तब्बल २२ गुन्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अंतर्गत १४ गुन्ह्यांची नोंद घेण्यात आली असून, एकूण १४८ प्रलंबित वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील १३५ हॉटेल्स आणि लॉजची तपासणी करून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. मोटार वाहन कायद्यांतर्गत नियमभंग केल्याप्रकरणी ६७१ कारवाया करून सुमारे पाच लाख १० हजार ३५० रुपयांचा दंड वसूल केला. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारची धडक मोहीम पुढील काळातही सातत्याने राबवली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.