जळगाव : नोकरीच्या शोधात असलेल्या विशेषतः खाकी वर्दी घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरूणांना पोलीस बनण्याची संधी आता चालून आली आहे. जळगाव येथील जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील एकूण १७१ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. त्या संदर्भात अधिकृत जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात १५ हजार ६३१ रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातही पोलीस शिपाई संवर्गात १७१ पदांसाठी भरती होणार आहे. पोलीस शिपाई पद भरतीची सविस्तर माहिती policerecruitment2025.mahait.org तसेच http://www.mahapolice.gov.in या दोन संकेतस्थळांवर उमेदवारांच्या सोयीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्याच प्रमाणे पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांना policerecruitment2025.mahait.org या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. अर्ज करण्यास बुधवारपासून सुरूवात झाली असून, येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत असणार आहे.
महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अर्धवेळ पदवीधर, पोलीस पाल्य आणि गृहरक्षक यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच एकूण रिक्त जागांपैकी एक टक्का जागा अनाथ प्रवर्गासाठी असतील. पोलीस शिपाई पदाच्या जाहिरातीनुसार १७१ जागांसाठी ही भरती केली जाईल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीसंबंधी सर्व अटी व शर्ती नीट वाचून समजून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर गैरव्यवहार अथवा अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता अधिकृत मार्गाने अर्ज करावा. पोलीस दलात सेवेसाठी इच्छुक असलेल्या तरूण-तरूणींसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे.
इच्छुक उमेदवारांनी पोलीस शिपाई पदासाठी अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवावी. अर्जातील माहिती अचूक आणि सत्य असावी; अन्यथा चुकीची अथवा भ्रामक माहिती आढळल्यास संबंधिताचा अर्ज बाद ठरवला जाऊ शकतो. भरती प्रक्रियेचे पुढील टप्पे, परीक्षा दिनांक, निकाल आदींबाबतची अद्ययावत माहिती अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाणार असल्याने उमेदवारांनी संकेतस्थळाला नियमित भेट देणे आवश्यक आहे. पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक क्षमतेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाणार आहे.
अशी होईल अंतिम निवड
पोलीस शिपाई भरतीत सहभागी उमेदवारांना दोन टप्प्यांत परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रथम टप्प्यात ५० गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल, तर दुसऱ्या टप्प्यात १०० गुणांची लेखी परीक्षा होईल. शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील. लेखी परीक्षेत देखील किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य असेल. शारीरिक आणि लेखी परीक्षेतील गुण एकत्र करून एकूण १५० गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल.
