जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यापासून जळगाव महापालिका काबीज करण्यासाठी भाजपने कोणतीच कसर ठेवलेली नाही. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याच्या मानसिकतेत असलेल्या भाजपने शिवसेनेला (उद्धव ठाकरे) मोठा धक्का देण्याची तयारी देखील केली आहे. सेवा पंधरवड्याच्या आडून ठाकरे गटाच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याशी पक्षाच्या नेत्यांनी जवळीक साधल्याचेही दिसून आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित १७ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा पंधरवडा अभियान आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत जळगाव शहरातही भाजपकडूनही स्वच्छता अभियानासह इतरही बरेच उपक्रम राबविण्यात आले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत कष्टकरी हमाल आणि मापाडींना रूमालांचे वाटप, हा त्याचाच एक भाग होता. ज्यासाठी भाजप आमदार सुरेश भोळे यांनी पुढाकार घेतला. निमित्त सेवा पंधरवड्याचे असले, तरी त्याच्या आडून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारण्याचे काम मात्र केले. कारण, बाजार समितीत सत्तांतर होऊन ठाकरे गटाचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे तिथे नुकतेच सभापती झाले आहेत.

जळगाव महापालिकेच्या २०१८ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. प्रत्यक्षात भाजपने सर्वाधिक जागा पटकावत महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, शिवसेनेने नंतरच्या काळात भाजपचे काही नगरसेवक फोडून महापालिकेची सत्ता ताब्यात घेत मंत्री गिरीश महाजन आणि आमदार सुरेश भोळे यांना मोठा धक्का दिला होता. अर्थात, त्यावेळी भाजपला शह देणाऱ्यांत सुनील महाजन हे अग्रस्थानी होते. भाजपचे नगरसेवक हाताशी आल्यानंतर महाजन यांच्या सौभाग्यवती जयश्री महाजन नंतर जळगावच्या महापौर बनल्या होत्या. विधानसभेच्या निवडणुकीतही महाजन परिवाराने भाजपसमोर पर्यायाने आमदार भोळे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केल्याचे दिसून आले. ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर भाजप आमदार भोळे आणि जयश्री महाजन यांच्यात थेट लढत रंगली होती.

आता पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीत भाजप विरोधात ठाकरे गटात झुंज होण्याची चिन्हे असताना, आमदार सुरेश भोळे आणि सुनील महाजन यांच्यात मनोमिलन झाल्याचा प्रत्यय शनिवारी आला. सेवा पंधरवड्यानिमित्त कष्टकरी हमाल व मापाडी यांना रूमाल वाटप करण्यासाठी आमदार भोळे थेट बाजार समितीत पोहोचले आणि महाजन यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. प्रसंगी त्यांच्यावर झेंडुच्या फुलांचा वर्षाव केला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार भोळे आणि महाजन यांच्यातील जवळीक पाहुन अनेकांच्या भुवया उंचावल्या. एरवी एकमेकांना पाण्यात पाहणारे दोघेजण एकत्र आल्याचे पाहुन नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. महापालिकेच्या निवडणुकीत कदाचित दोघे हातात हात घालूनही फिरतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली.