जळगाव – जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजण्यापूर्वीच महायुतीच्या भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या दोन्ही घटक पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनीही युती होत नसल्यास आपण रणांगणात उतरण्यास तयार असल्याचे वक्तव्ये केली आहेत.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपची एकहाती सत्ता आणण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आधीच तयारीत राहण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, कोणी कसाही असला तरी त्याला भाजपमध्ये घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या विरोधात लढणाऱ्यांना पक्षात प्रवेश न देण्याचा निर्णय भाजपसह शिंदे गट आणि अजित पवार गटाने घेतला होता. त्यालाही तिन्ही घटक पक्षांनी आता तिलांजली दिली आहे. दुसऱ्या पक्षातील लोकांना प्रवेश देताना चाळणी लावली पाहिजे, असा आग्रह विशेषतः मंत्री गुलाबराव पाटील यांचा होता. प्रत्यक्षात, आधी अजित पवार गटाने त्यानंतर भाजप आणि आता शिंदे गटाने कोणी कोणत्याही पक्षाचा तसेच महायुतीच्या विरोधात यापूर्वी लढलेला असला, तरी त्याला डोळे झाकून प्रवेश देण्याचे धोरण स्वीकारले आहे.

अशा स्थितीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीची भाषा करण्याऐवजी स्वबळाची भाषा विशेषतः भाजप आणि शिंदे गट करताना दिसून येत आहे. त्याची सुरूवात पाचोरा आणि अमळनेरमधून झाली देखील आहे. भाजपने पाचोऱ्यात शिंदे गटाच्या आमदारांचे सर्व विरोधक आपल्या पक्षात घेऊन आधीच आगीत तेल ओतले आहे. दुसरीकडे, अमळनेरमध्ये शिंदे गटाने माजी आमदार शिरीष चौधरी यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन भाजपला डिवचण्याची संधी साधली आहे. हाच कित्ता इतर बऱ्याच तालुक्यात गिरविला जाण्याची चिन्हे असल्याने आगामी काळात महायुतीच्या तिन्ही पक्षांमधील बेबनाव आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीत एकत्र लढलेल्या पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे वितुष्ठ वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अजित पवार गटाचा सावध पवित्रा

जिल्ह्यात आपले वर्चस्व राखण्यासाठी भाजपसह शिंदे गटात राजकीय चढाओढ सुरू असताना, तुलनेत राष्ट्रवादीने (अजित पवार) काहीसा सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. शरद पवार गटाचे दोन माजी मंत्री तसेच दोन माजी आमदारांना आणि काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांना पक्षात प्रवेश देऊन अजित पवार गटाने भाजपसह शिंदे गटावर कडी केली होती. मात्र, त्यानंतर अजित पवार गटातील हालचाली मंदावल्या आहेत. नवीन प्रवेश किंवा मेळावे घेण्यातही पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये फार उत्साह दिसून आलेला नाही. जिल्ह्यात युती होते किंवा नाही होते, त्याकडे लक्ष ठेवून कोणत्या ठिकाणी किती उमेदवार उभे करता येतील, त्याची चाचपणी मात्र अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी करून ठेवली आहे.