जळगाव – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लाचखोरीची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहेत. पाचोरा येथील सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला १५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना बुधवारी रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने यशस्वी केली.

गणेश बाबुराव लोखंडे (३७), असे लाच स्वीकारल्याचा आरोप असलेल्या संशयिताचे नाव आहे. लोखंडे हे पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी पदावर कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे कोकडी (ता. पाचोरा) शिवारात पोट खराब क्षेत्र असून, ते त्यांनी मेहनत वहितीखाली आणले आहे. तसेच त्या क्षेत्रावर ते सध्या पीक लागवड करत आहे.

परंतु, सदरचे क्षेत्र हे गाव नमुना नंबर ७/१२ मध्ये पोट खराब म्हणून दाखल असल्याने त्यांना नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई आणि शेती विषयक कर्ज मिळत नाही. म्हणून सदरचे पोट खराब क्षेत्र गाव नमुना नंबर ७/१२ वर वहितीखाली लावणेकामी तक्रारदार यांनी पत्नीचे नाव लावण्यासाठी पाचोरा उपविभागीय कार्यालयात अर्ज केला होता. अर्जात नमुद केलेले काम करून देण्यासाठी सदर कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी गणेश लोखंडे यांची भेट तक्रारदाराने घेतली.

प्रत्यक्षात, काम करून देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रूपये लाचेची मागणी संशयित महसूल अधिकारी लोखंडे यांनी केली. तक्रारदाराने लोखंडे यांना पाच हजार रुपये रोख देऊन उर्वरित १० हजार रुपये दिल्यावर तुमचे काम करुन देईल, असे सांगितले होते. परंतु, तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

सदर तक्रारीची पडताळणी केली असता लोखंडे यांनी यापूर्वीचे पाच हजार रूपये स्वीकारल्याचे कबुल करून बाकी १० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. त्याप्रमाणे बुधवारी सापळा कारवाई दरम्यान गणेश लोखंडे यांनी तक्रारदार यांच्याशी चर्चा करून मागणी केलेल्या १५ हजार रूपये लाचेच्या रकमेपैकी दुसरा हप्ता म्हणून १० हजार रुपये लाचेची रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारली. त्यांना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले.

सदरची कारवाई जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी हेमंत नागरे, पोलीस शिपाई भूषण पाटील. राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी भारत तांगडे यांनी यशस्वी केली. दरम्यान, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा कोणी लोक सेवकाने लाचेची मागणी केल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना केले आहे.