जळगाव – शालार्थ घोटाळ्याची व्याप्ती जिल्ह्यापर्यंत पसरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पडताळणी न करता परस्पर शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती केल्याच्या प्रकरणात ६८ शिक्षकांची लातूर येथील एसएससी बोर्डाच्या अध्यक्षांसमोर नुकतीच सुनावणी झाली. त्यानंतर सोमवारी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील १० शाळांच्या मुख्याध्यापकांकडून आवश्यक ती सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली.
शालार्थ घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण आयुक्तांनी काही दिवसांपूर्वीच संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. शालार्थ घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर नाशिकरोड पोलिस ठाण्यात शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी उदय पंचभाई तसेच जळगाव येथील माध्यमिक वेतन पथकाचे अधीक्षक राजमोहन शर्मा यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या व्यतिरिक्त शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने संबंधित शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शाळांच्या पदाधिकाऱ्यांवरही फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच अनुषंगाने या प्रकरणातील सर्व ६८ संशयितांची सुनावणी लातूर येथे घेण्यात आली.
याशिवाय, शालार्थ घोटाळ्याचा संशय असलेल्या संबंधित १० शाळांच्या मुख्याध्यापकांना शालार्थ प्रणाली, कायम मान्यता आदेश, शाळा मान्यतेची कागदपत्रे यासंबंधी चौकशी करण्यासाठी नुकतेच नाशिक येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. त्या प्रक्रियेनंतर सोमवारी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे पथक थेट जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात दाखल झाले. या वेळी त्यांनी संबंधित १० मुख्याध्यापकांकडून आवश्यक ती सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली. वेळ पडल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येईल, असे सांगितले. त्यास माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनीही दुजोरा दिला.
दरम्यान, राज्यभरात २०१२ पासून शिक्षक भरतीवर बंदी असतानाही जळगाव जिल्ह्यात काही शैक्षणिक संस्थांचे चालक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांनी संगनमताने शालार्थ आयडी घोटाळा करून बेकायदेशीर शिक्षक भरती केला, असा आरोप शिक्षण बचाव कृती समितीने केला आहे. या प्रकरणी संशयितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदनही समितीच्या वतीने निवृत्त प्राचार्य डॉ.एस.एस.राणे, दिलीप जैन, मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले आहे. दुसरीकडे, शालार्थ घोटाळ्यातील सहभागाच्या आरोपावरून गुन्हा दाखल होऊन अटक झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जळगावात शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी सामूहिक रजा आंदोलन केले होते.