जळगाव – जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात कपाशीची लागवड कमी करून मकासोबत सोयाबीन पिकावर भर दिला आहे. मात्र, उशिरा झालेली पेरणी तसेच मर्यादित पाऊस आणि सततच्या ढगाळ हवामानामुळे सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडण्याचे प्रकार आता वाढले आहेत. पाने पिवळी पडल्यामुळे पिकाची वाढ थांबून उत्पादनातही घट येण्याची शक्यता वाढली आहे.
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर सोयाबीन पिकाची पेरणी आटोपली. नंतरच्या काळात कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागत राहिल्याने सोयाबीनचे पीक चांगले तरारले. परंतु, पीक वाढीच्या अवस्थेत नेमका पावसाचा जोर कमी झाल्याने सोयाबीन पिकाला त्याचा फटका बसला आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे संबंधित सर्व शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा डोस देण्यात मर्यादा आली असताना, सोयाबीनचे पीक हळूहळू पिवळे पडत आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते ही लोह किंवा फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे जाणवणारी क्लोरोसिसची लक्षणे आहेत. क्लोरोसिस ही एक विकृती आहे. आणि तिच्या नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत.
पाने पिवळी पडण्याची कारणे
पाण्याचा निचरा कमी प्रमाणात होणाऱ्या तसेच चुनखडीयुक्त जमिनीत प्रामुख्याने सोयाबीन पिकामध्ये लोहाची कमतरता दिसून येते. वनस्पतींमध्ये हिरवे रंगद्रव्य तयार करण्यासाठी लोह या घटकाची आवश्यकता असते. बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह उपलब्धही असते. मात्र, बर्याचवेळा जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असल्याकारणाने जमिनीतील लोह सोयाबीन पिकाला शोषून घेता येता नाही. त्यामुळे लोहाची कमतरता जाणवून सोयाबीनची पाने हळूहळू पिवळी पडू लागतात. कमी पावसामुळे जमिनीतील ओलावा नष्ट झाल्याने पीक वाढीकरिता आवश्यक पाणी व अन्नद्रव्यांची कमतरता उद्भवते तसेच सतत ढगाळ वातावरण राहिल्यास पुरेशा सूर्य उन्हाअभावी सुद्धा प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. परिणामी, सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडतात, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तर सोयाबीनचे पीक सुधारेल…
सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडत असल्याचे दिसून येताच चिलेटेड आयर्न किंवा फेरस सल्फेटची शिफारशीनुसार फवारणी करावी. जमिनीचा सामू (पीएच) कमी करण्यासाठी शेतीत सेंद्रिय घटकांचा वापर वाढवावा. सोयाबीन पीक वाढीच्या टप्प्यावर सूक्ष्म अन्नद्रव्ये संतुलित स्वरूपात द्यावीत. शेतकऱ्यांनी वेळेवर योग्य त्या उपाययोजना केल्यास सोयाबीन पिकात सुधारणा होऊन उत्पादनात घट येण्याची जोखीम टाळली जाऊ शकते, असा सल्ला जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बाहेती यांनी दिला आहे.