जळगाव : जिल्ह्यात दिवाळीच्या तोंडावर थंडीची चाहूल लागताच बाजारात भरिताची वांगी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येऊ लागतात. घरोघरी मस्त भरीत-पुरीचा बेत आखला जातो. शेतांमध्येही भरीत पार्ट्या रंगू लागतात. हे चित्र बहुधा यंदा दुर्मिळ होणार आहे. कारण, प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन घटल्याने भरिताची वांगी आताच १०० रूपये प्रति किलोने विकली जात आहेत.
जिल्ह्यातील यावल, रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर, पाचोरा आणि जळगाव तालुक्यात प्रामुख्याने भरिताच्या वांग्याचे उत्पादन घेतले जाते. हिवाळ्याच्या दिवसात उत्पादन हाती येईल, या हिशेबाने संबंधित शेतकरी दरवर्षी साधारण जून महिन्यात भरिताच्या वांग्याची रोप लागवड करतात. साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत बाजारात टप्प्याटप्याने वांग्याची आवक सुरू राहते. हिवाळ्यात थंडीची चाहुल लागल्यावर चवदार भरीत खाण्याची मजा काही और असते. साहजिक थंडीचा जोर वाढल्यावर वांग्याचे भरीत आणि त्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या शेती शिवारातील पार्ट्यांची रंगत वाढते. बाजारात भरिताची वांगी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडते. खास भरीत पुरी, कळण्याची भाकरी, मिरचीचा ठेचा आणि कढीचा मेनू ठेवणारी हॉटेल्स जोमात चालतात.
यंदाही बऱ्याच शेतकऱ्यांनी खास गावरान वांग्याच्या बियाण्यापासून तयार केलेल्या रोपांची लागवड जून महिन्यात शेतांमध्ये केली होती. परंतु, सप्टेंबर महिन्यातील सततच्या ढगाळ हवामानासह अतिपावसाने मोठ्या प्रमाणात फुलगळ झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. दिवाळीच्या तोंडावर वांग्यांचे जोमदार उत्पादन सुरू होऊन चांगल्या बाजारभावाची आशा संबंधित सर्व शेतकरी बाळगून होते. आता सध्या बाजारात जेवढी काही वांगी विक्रीसाठी येत आहेत, ती उन्हाळी लागवडीची आहेत. आणि त्यांना दिवाळीच्या काळात सुमारे १६० रूपयांचा भाव मिळाला. आताही बाजारात ही वांगी १०० रूपयांपर्यंत विकली जात आहेत. गेल्या वर्षी याच दिवसावर भरिताच्या वांग्यांना ६० रूपये किलोचा भाव होता.
तयार भरीत २८० रूपये किलो
भरिताची वांगी बाजारात अलीकडे बाराही महिने विक्रीसाठी येत असली, तरी भरीत खाण्याची खरी मजा हिवाळ्याच्या दिवसातच असते. मात्र, यंदा प्रतिकूल हवामानामुळे मोठ्या प्रमाणात फुलगळ होऊन उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारातील महाग भरिताच्या वांग्यांनी खवय्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. जळगाव शहरातील विविध हॉटेल्सवर मिळणाऱ्या भरिताच्या दरात सुद्धा १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी २०० ते २४० रूपये किलो प्रमाणे मिळणारे भरीत आता २५० ते २८० रूपये किलो दराने विकले जात आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही एक एकरावर जून महिन्यात भरीत वांग्याच्या रोपांची लागवड केली होती. त्यापासून दिवाळीच्या तोंडावर उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा असताना, दिवाळी आटोपली तरी अद्याप एकही वांगे निघालेले नाही. रवींद्र महाजन (शेतकरी- आसोदा, ता. जि. जळगाव)
