Jalgaon Wild Vegetable Festival 2025 – पावसाळ्यात बाजारामध्ये विविध प्रकारच्या भाज्यांची रेलचेल असते. याच हंगामात जंगलासह शेतांमध्ये अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण रानभाज्याही उगवतात. त्यांचे पौष्टिक आणि आरोग्यवर्धक फायदे नागरिकांपर्यंत पोहोचावेत तसेच पारंपरिक अन्न संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने जळगावमध्ये रविवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्याचे उद्घाटन केले.

जळगाव शहरातील रोटरी भवनात आत्मा प्रकल्प संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र जळगाव आणि पाल तसेच रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यात स्थानिक व आदिवासी शेतकरी, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गटांनी स्टॉल लावून रानभाज्यांची माहिती, पाककृती आणि त्यांचे औषधी गुणधर्म सांगितले. आरोग्य तज्ज्ञांनी रानभाज्यांचे पोषणमूल्य, पचनास मदत करणारे गुण तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने नागरिकांनी महोत्सवाला हजेरी लावली.

आधुनिक खाद्य पदार्थांच्या गर्दीत हरवलेली रानभाजी संस्कृती जतन करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. पुढील वर्षी हा महोत्सव आणखी मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. जवळपास ८० स्टॉलच्या माध्यमातून पावसाळी हंगामातील रानभाज्यांची विविधता नागरिकांना अगदीच जवळून पाहण्यास मिळाली. या प्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष गौरव सापळे, प्रकल्प प्रमुख योगेश भोळे, सचिव देवेश कोठारी, महेश सोनी, कृषी विभागातील अधिकारी, व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्य टिकवण्यासाठी आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रानभाज्यांचा आहारात समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. रानभाज्या हे खरे निसर्गाची देणे असून, कोणतीच फवारणी नसल्याने त्या सेंद्रिय, सुरक्षित व पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात, असे पालकमंत्री पाटील म्हणाले. करोना काळात रानभाज्यांमुळे अनेकांचे आरोग्य सुधारले होते. नव्या पिढीला त्यांची ओळख करून देणारा हा महोत्सव महत्त्वपूर्ण आहे. पावसाळी हंगामात मिळणाऱ्या या भाज्यांपासून विविध पदार्थ बनवा. रानभाजीचा आहारात समावेश करून निरोगी जीवन जगा, असा सल्लाही पालकमंत्री पाटील यांनी दिला. यावेळी रोटरी क्लबच्या तर्फे ७५ गरजू विद्यार्थ्यांना शाळेचे दप्तर वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन श्रीकांत झांबरे यांनी केले. आभार प्रकल्प उपसंचालक भरत इंगळे यांनी मानले.