जळगाव: जिल्हा परिषद निवडणुकीची आरक्षण सोडत काढण्यात आल्यानंतर अनेक गट राखीव झाल्याने प्रस्थापितांना मोठा धक्का बसला आहे. अध्यक्षपदावर डोळा ठेवून असलेल्या मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील समर्थकांच्या गडांनाही सुरूंग लागले आहेत. संबंधितांना बहुतेक आता पर्यायी गटांचा शोध घ्यावा लागणार आहे. जिल्ह्यातील एकूण ६८ गटांपैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३१, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १८, अनुसूचित जमातीसाठी १३, अनुसूचित जातीसाठी सहा, असे गटनिहाय आरक्षण निघाले आहे. त्यापैकी ५० टक्के म्हणजेच ३४ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गटात यावेळी सर्वसाधारण महिला आरक्षण निघाले आहे. त्यामुळे त्यांचे चिंरजीव माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांची मोठी अडचण झाली आहे. महिला आरक्षणामुळे मंत्री पाटील यांना पाळधीत एकतर त्यांच्या कुटुंबातील महिलेला उमेदवारी द्यावी लागेल किंवा मुलगा प्रताप याच्यासाठी दुसऱ्या पर्यायी गटाचा शोध घ्यावा लागेल, असे दिसते. मंत्री पाटील यांचे खंदे समर्थक मानले जाणारे गोपाल चौधरी यांचा पिंप्री खुर्द गट देखील यावेळी अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे.
याशिवाय, जळगाव तालुक्यातील असोदा गटासाठी इच्छुक पालकमंत्री पाटील यांचे खंदे समर्थक तुषार महाजन आणि कानळदा गटासाठी इच्छुक राजेंद्र चव्हाण यांची अनुसूचित जमातीच्या (महिला) आरक्षणामुळे मोठी पंचाईत झाली आहे. दुसरीकडे, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करणारे असोदा येथील रवी देशमुख यांचाही मोठा हिरमोड झाला आहे. म्हसावद गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणामुळे मंत्री पाटील यांचे कट्टर समर्थक माजी सदस्य पवन सोनवणे यांच्या समोरील आव्हाने वाढल्याचे बोलले जात आहे.
कानळदा गट अनुसूचित जमाती (महिला) राखीव झाल्याने बऱ्याच दिवसांपासून जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्यासाठी तयारीला लागलेले भाजपचे माजी तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी यांनाही मोठा फटका बसला आहे. भाजपचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांचा नशिराबाद-भादली गट आता कुसुंबा-भादली गटात रूपांतरीत झाला आहे. आणि त्या गटाचे आरक्षण यावेळी नेमके सर्वसाधारण महिला निघाले आहे. त्यामुळे पाटील यांना एकतर दुसऱ्या गटाचा शोध घ्यावा लागेल किंवा त्यांच्या पत्नीसाठी भाजपकडे उमेदवारी मागावी लागेल.
भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांचा पारंपरिक ऐनपूर-खिरवड हा गट आता निंभोरा-खिरवड गटात रूपांतरीत झाला आहे. विशेष म्हणजे त्या गटाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी निघाले आहे. त्यामुळे रंजना पाटील यांनाही दुसऱ्या गटाचा शोध घ्यावा लागणार आहे. या व्यतिरिक्त, भाजपचे जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे यांचा पिंपळगाव हरेश्वर गट, ज्येष्ठ पदाधिकारी पोपटराव भोळे यांचा पातोंडा गट ओबीसी महिला राखीव झाला आहे. तसेच भाजपचे रावेर लोकसभा क्षेत्राचे प्रमुख नंदकिशोर महाजन यांचा निंभोरा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. भाजपचे माजी सदस्य आर. जी. पाटील यांच्या किनगाव गटाचे आरक्षण देखील अनुसूचित जमाती महिला राखीव निघाले आहे. माजी गटनेते पी. सी. पाटील यांचा पिंप्री खुर्द गटही अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे.