नाशिक : संततधारेमुळे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून आतापर्यंत प्रवाहित झालेल्या सुमारे ३१ टीएमसी पाण्यामुळे यंदा विक्रमी वेळेत बुधवारी दुपारी मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील उपयुक्त जलसाठा ६५.०३ टक्के म्हणजे ५० टीएमसीवर पोहोचला. यामुळे समन्यायी तत्वानुसार गोदावरी खोऱ्यातील उर्ध्व भागातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा विषय यावर्षी संपुष्टात आला आहे.

घाटमाथ्यावर सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून आतापर्यंत २७ हजार ८५६ दशलक्ष घनफूट म्हणजे सुमारे २८ टीएमसी तर अहिल्यानगरमधील ओझर बंधाऱ्यातून प्रवरा नदीत तीन टीएमसी असे आजपर्यंत एकूण ३१ टीएमसी पाणी जायकवाडी धरणाकडे प्रवाहित झाले आहे.

सोमवारी दुपारी जायकवाडी धरणात उपयुक्त जलसाठा ६५ टक्क्यांवर गेल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. जायकवाडीची पाणी साठवण क्षमता १०२.६५ टीएमसी असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ७६.६५ टीएमसी आहे.

पाणी टंचाईच्या काळात जायकवाडी धरण ६५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी भरलेले असेल, तेव्हा गोदावरीच्या उर्ध्व धरणातून पाणी सोडावे लागते. यावर्षी विक्रमी वेळेत जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ६५ टक्के झाल्यामुळे समन्यायी वाटप तत्वानुसार यावर्षी जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा विषय संपला असल्याचे जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी सांगितले.

…तर जायकवाडीतूनही विसर्गाची वेळ

समन्यायी पाणी वाटप सूत्रानुसार २०२३ चा अपवाद वगळता मागील सात वर्षात जायकवाडीला पाणी सोडण्याची वेळ आली नाही. यापूर्वी २०१२ पासून २०२५ पर्यंतच्या १४ वर्षात २०१२, २०१३, २०१४, २०१५, २०१८ आणि २०२३ मध्ये पाणी सोडण्यात आले होते. यंदा घाटमाथ्यावर सातत्याने मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे पावसाळ्याच्या पूर्वार्धात जायकवाडीकडे मोठ्या प्रमाणात पाणी गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धरण सुरक्षिततेच्या अनुषंगाने तयार केलेल्या धरण जलाशय परिचालन सुचीनुसार अपेक्षित जलसाठा धरणात ठेऊन अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास जलाशय परिचालन सुचीनुसार जायकवाडी धरणातून पुढील काही दिवसांत गोदावरी नदीत पाणी सोडावे लागेल, असा अंदाज निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी व्यक्त केला.