नाशिक – मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहराच्या सद्यस्थितीसह राज्यातील प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उध्दव ठाकरे) आणि मनसे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर संयुक्त मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत काळ्या रंगाचे ध्वज हाती घेतले होते.

ठाकरे गट आणि मनसे यांनी एकत्र येत प्रथमच नाशिकमध्ये संयुक्त मोर्चा काढला. या मोर्चाला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नसला तरी दोन्ही बाजूंकडून ही गर्दी उत्स्फूर्त असल्याचा दावा करण्यात आला. मनसेचे बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. मोर्चात राज्यासमोरील शेतकरी कर्जमाफी, महिलांवरील वाढते अत्याचार, मधुजाल, अमली पदार्थाचा विळखा, या विषयांकडे लक्ष वेधणारे वेगवेगळे चित्ररथ तयार करण्यात आले होते. मोर्चात राक्षसाचा गणवेश परिधान केलेला व्यक्ती सहभागी होता.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यावर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी मनसेचे बाळा नांदगावकर यांनी नाशिकच्या अवस्थेविषयी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. नाशिक शहराला मुख्यमंत्री यांनी दत्तक घेतले. मात्र या शहराची काय अवस्था झाली आहे. शहरात गुन्हेगारी वाढली असून महिलांवर अत्याचार,लुटमार, हत्या होत आहेत. तरूणाईला अमली पदार्थांचा विळखा पडला असून शाळेबाहेरील टपरीवरही अमली पदार्थ सहज मिळत आहेत. मधुजालचे काय झाले ?, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आहे. शिक्षकांचे प्रश्न जैसे थे आहेत. सरकारच्या नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढल्याचे नांदगावकर यांनी नमूद केले.

खासदार राऊत यांनी राज्य सरकारच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले. शहरात एका युवकाची भाजपचा कार्यकर्ता हत्या करतो. त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. तो मंत्री गिरीश महाजन किंवा अन्य कोणाला भेटतो, पण पोलिसांना सापडत नाही. उलट एखादे आंदोलन झाले की आमचे कार्यकर्ते गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना लगेच सापडतात, असे राऊत यांनी सांगितले.

शहरात अमली पदार्थाचा वापर, कर्जमाफी, महिला अत्याचार या मुद्यांवर त्यांनी मत मांडले. हा संयुक्त मोर्चा मनसे आणि ठाकरे गट कार्यक्रमांची एकत्र सुरूवात आहे. यापुढे नाशिक सह राज्यात सर्वत्र एकत्र कार्यक्रम होतील. ठाकरे बंधुंचे कुळ आणि मूळ एकच असल्याने ते एकत्र येणारच, असा दावा त्यांनी केला.

अभ्यंकर यांनी, दत्तक नाशिक पोरके झाले आहे, अशी टीका केली. जिल्ह्यात चार मंत्री आहेत. त्यांच्यात पालकमंत्री पदावरून स्पर्धा लागली आहे. जनता विविध समस्यांनी त्रस्त आहे. जनतेला गृहित धरले जात आहे. फक्त दुसऱ्यांचे नगरसेवक ओरबाडायचे, कशाही पध्दतीने सत्तेत यायचे आणि सत्ता उपभोगायची, असे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मोर्चामुळे मार्गावर वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आला असता रस्त्यावरची दोन्हीकडील वाहतूकबंद करण्यात आल्याने सर्वांनाच अडचणींना तोंड द्यावे लागले.