नाशिक – शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांविषयी सर्वसामान्यांच्या मनात काही ग्रह असतात. अर्थात, त्यांना बहुसंख्य अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अनुभवच तसा येतो. समाजाशी दायित्व नसणारी ही मंडळी असतात, लोकांची कामे तत्परतेने करण्यात टाळाटाळ करतात, पैशांशिवाय काम करत नाहीत, अशी दुषणे दिली जातात. परंतु, काही अधिकारी त्यास अपवाद असतात. कोकण विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे त्यापैकी एक. डाॅ. सूर्यवंशी यांनी समाजाप्रति असलेली कटिबध्दता आपल्या एका उदाहरणाने पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत आणि त्यांना शासकीय सेवेत संधी मिळावी, यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महिनाभरापूर्वी नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील डॉ. दौलतराव आहेर वाचनालय व अभ्यासिकेला दिलेल्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना दिले होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अभ्यास करतांना येणाऱ्या अडचणी, अभ्यासिकेतील गरजा आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक साहित्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांनी अधिक पुस्तकांची मागणी केली होती. डॉ. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांची मागणी ध्यानात ठेवली. आणि आपल्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ २०० ग्रंथांचा संच अभ्यासिकेला भेट दिला.
यासंदर्भातील कार्यक्रम देवळा येथील डॉ. दौलतराव आहेर वाचनालय आणि अभ्यासिकेच्या सभागृहात झाला. यावेळी डाॅ. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या क्षमतांचा प्रामाणिकपणे शोध घ्यावा आणि स्पर्धा परीक्षेकडे गंभीरतेने पाहावे, असे आवाहन केले. स्पर्धा परीक्षेतील यशासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले. दूरदृश्य प्रणालीव्दारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मान्यवरांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करणार असल्याची माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.
भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी अभ्यासिकेला लवकरच दूरदृश्यप्रणालीव्दारे चर्चेची (व्हिडिओ कॉन्फरन्स) सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन दिले. प्रमुख पाहुणे म्हणून देवळा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष प्रशांत देवरे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक विजय पगार, माजी संचालक प्रमोद पाटील, डॉ. व्ही. एम. निकम, डॉ. रमणलाल सुराणा, उद्योजक अरूण पवार, डॉ. वसंत आहेर, आदी उपस्थित होते.
कसमादे (कळवण सटाणा मालेगाव देवळा) ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे, अभ्यासिकेचे व्यवस्थापक निलेश मोरे आणि पूजा नवले यांनी स्वागत केले. प्रास्ताविक भगवान आहेर यांनी केले. कोकण विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमोद पाटील यांनी आभार मानले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, राजेंद्र सूर्यवंशी, किशोर आहेर, सुनील देवरे, एस. टी. पाटील, रोशन सूर्यवंशी, बंडू आहेर, दिलीप आहेर आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
