नाशिक – शहरात कुठे धक्का लागला तरी चाकू भोसकणे, हत्या करणे, असे प्रकार घडतात. मद्यपान करून तीन, चार जण एकाच वाहनावर फिरतात. एमडी ड्रग्जचा वापर होत आहे. यावर वेळीच नियंत्रण आणणे आवश्यक आहे. गुन्हेगार कुठल्याही पक्षाचा असो, त्याची हयगय केली जाणार नाही. घर, बंगले, कोट्यवधींच्या जागा बळकावून फलक लावणे, ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करणे अशी भूमाफियांची प्रकरणे समोर आली आहेत. धार्मिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या नाशिकमध्ये गुंडांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. असा इशारा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्यावतीने शुक्रवारी उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक पंचवटीतील स्वामी नारायण केंद्रातील सभागृहात पार पडली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री महाजन यांनी शहरातील गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी सुरू केेलल्या धडक कारवाईकडे लक्ष वेधले. वाढत्या गुन्हेगारीविरोधात मागील महिन्यात मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनी संयुक्त मोर्चा काढला होता. गुन्हेगारीचा उंचावता आलेख महापालिका निवडणुकीत अडचणीचा ठरू शकतो.

नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. यासंदर्भात भाजपच्या स्थानिक आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे आणि राहुल ढिकले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे परिस्थिती मांडल्यानंतर चक्रे वेगात फिरली. पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली. त्या अंतर्गत हॉटेल चालकाकडून खंडणी वसुलीच्या प्रकरणात रिपाइंचा (आठवले गट) पदाधिकारी तथा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, मुलगा दीपक उर्फ नाना लोंढे यांना तर, जुन्या वादातून गोळीबार केल्याच्या प्रकरणात भाजपचे नेते सुनील बागूल यांचा पुतण्या गौरव बागूल याच्यासह अलीकडेच भाजपवासी झालेल्या बाबासाहेब उर्फ मामा राजवाडे यांच्यावर अटकेची कारवाई झाली. गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके, त्यांचे साथीदार, गुन्हेगारांची छायाचित्रे फलकांवर झळकविणारे, दहशतीसाठी चित्रफिती तयार करणारे, टवाळखोर अशा सर्वांंवर कारवाई सुरू आहे.

गुन्हेगारी रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्या अंतर्गत काही वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून हितसंबंध जोपासले जाऊ नयेत, म्हणून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या. सध्याच्या धडक कारवाईचे परिणाम दृष्टीपथास पडत आहेत. कारवाईत कुठलाही पक्षभेद केला जाणार नाही. नाशिकला ऐतिहासिक, धार्मिक ऐतिहासिक पार्श्वभूमी असून कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.

काही टोळ्या गरीबांची पिढीजात जमीन, घरे, बंगले बळकाविण्याचे उद्योग करीत आहेत. जमिनीवर फलक लावायचे, टपऱ्या ठेवायच्या, ॲट्रॉसिटीची करायची, अशी त्यांची कार्यपद्धती आहे. गरीब शेतकरी, गुंतवणूकदार वा अन्य कुणाच्या जमिनी बळकावू दिल्या जाणार नाहीत. अशा भू माफियांना सोडले जाणार नाही. नागरिकांनी संबंधितांविरोधात तक्रारी देण्यास पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. नाशिकच्या काही गुंडांना जास्त माज आला आहे. गुंडगिरी, टोळ्यांची दहशत संपवून नाशिकला गुन्हेगारीमुक्त शहर केले जाईल, असे महाजन यांनी सांगितले.