लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: शहरातील नामांकित रचना विद्यालय या शाळेची जागा भूमाफियांनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रातोरात पत्र्याचे शेड उभारत ती बळकावण्याचा भूमाफियांचा प्रयत्न होता. या विरोधात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार देवयानी फरांदे आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे दाद मागितली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करीत न्यायालयीन निर्णयाशिवाय जागेवरील परिस्थितीत बदल करण्यास प्रतिबंध केला.

शहरातील जमिनींचे दर गगनाला भिडल्यानंतर भूमाफियांचे अनेक कारनामे आजवर उघड झाले आहेत. भूमाफियांकडून जागा कशा बळकावल्या जातात, यावर दीड वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनी सरकारला पत्र लिहून प्रकाशझोत टाकला होता. शासकीय व खासगी जमिनी बळकावण्यासाठी धडपडणाऱ्या भूमाफियांची नजर आता शैक्षणिक संस्थांच्या जागांवर असल्याचे उपरोक्त घटनेतून समोर आले. भूमाफियांच्या दडपशाहीने संस्था चालकांसह शिक्षक, पालक व विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण पसरले.

आणखी वाचा-ऑनलाईन तक्रारींविषयी नाशिक मनपाकडून धूळफेक?

शरणपूर रस्त्यावरील रचना विद्यालय ही शहरातील अतिशय जुनी, नावाजलेली मराठी शाळा आहे. महाराष्ट्र समाज सेवा संघ ५४ वर्षांपासून नाशिक डायोसेशन ट्रस्टच्या मालकीच्या जागेवर संस्थेने बांधलेल्या इमारतीत ती चालविली जाते. तेव्हापासून सहा हजार चौरस मीटर क्षेत्राची जागा संस्थेच्या ताब्यात आहे. प्रारंभी भाडेतत्वावर आणि नंतर ती खरेदी करण्यासाठी संस्थेने २००० साली नोंदणीकृत साठेखत करारनामाही केला आहे. धर्मदाय आयुक्तांची परवानगी मिळाली नसल्याने खरेदी बाकी आहे. खरेदी होईपर्यंत ही जागा भाडेकरु हक्काने महाराष्ट्र समाज सेवा संघाकडे राहील असे करारनाम्यात नमूद आहे. असे असताना शाळेच्या मैदानातील काही क्षेत्राचे नाशिक डायोसेशन कौन्सिल ट्रस्ट प्रा. लि. ( एनडीसीडी प्रा. लि.) या कंपनीने तिऱ्हाईत व्यक्तीला भाडे करारनामा करून दिल्याचे संस्थेच्या लक्षात आले. काही व्यक्तींनी बंद पडलेल्या कंपनीत स्वत:ची नावे संचालक म्हणून नोंदवत संबंधितांनी बेकायदेशीर व बनावट दस्तावेजाने व्यवहार केल्याची संस्थेची तक्रार आहे. नियमानुसार भाडे करारनामा (लिज डीड) ५० वर्ष कालावधीचा करताच येत नाही. या बेकायदेशीर कामाला शासकीय यंत्रणेने हातभार लावत दस्त नोंदणी केली. या बनावट दस्ताचा आधार घेऊन शैक्षणिक संस्थेच्या ताब्यातील जागा पत्र्याची शेड व दरवाजा उभारून ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला.

आणखी वाचा-अमली पदार्थ प्रकरणात बी. जी. शेखर यांचाही हात; आ. फारुक शहा यांचा आरोप

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस, स्थानिक आमदार आणि पालकमंत्री यांची भेट घेऊन हा प्रकार कथन केला. या संदर्भात शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सुनावणी सुरू आहे. असे असताना भूमाफिया ही जागा ताब्यात घेऊन मराठी शाळांची गळचेपी करीत असल्याकडे संस्थेने लक्ष वेधले. भूमाफियांच्या जोखडातून शाळेच्या जागेची मुक्तता करण्याची मागणी करण्यात आली. आमदार फरांदे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सूचना दिल्या. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करीत शाळेच्या जागेवरील शेड उभारणीचे काम थांबवले. या प्रश्नी संस्था दिवाणी व फौजदारी न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. न्यायालयीन निर्णयाशिवाय जागेवरील स्थितीत कुठलाही बदल करण्यास पोलिसांनी प्रतिबंध केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रचना विद्यालय ही शहरातील जुनी शाळा आहे. शेकडो गोरगरीब विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात. जागेच्या विषयाबाबत महाराष्ट्र समाज सेवा संघाचे पदाधिकारी भेटायला आले होते. या संदर्भात पोलिसांनाही सूचना केल्या आहेत. शाळेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. -आ. देवयानी फरांदे (आमदार, नाशिक मध्य)