नाशिक – हत्या, प्राणघातक हल्ले, टोळक्यांचा धुडगूस, लूटमार, महिलांच्या अंगावरील सोनसाखळी खेचण्याच्या वाढत्या घटनांनी कुंभनगरी नाशिक शहरात गुन्हेगारांकडून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिले जात आहे. २०२३ आणि २०२४ या वर्षात शहरात ४२ आणि ४० हत्यांची नोंद झाली होती. चालू वर्षात ४२ हत्यांची संख्या नऊ महिन्यातच गाठली गेली आहे. वाढत्या गुन्हेगारीला राजकीय बळ असल्याचेही उघड झाले आहे.
शहरात वर्चस्ववादावरून टोळ्यांमध्ये परस्परांचा वचपा काढण्याची जणू स्पर्धा लागली आहे. टोळक्यांकडून लूटमार, दहशत पसरविण्याचे प्रकार घडत आहेत. किरकोळ कारणांवरून हत्या केल्या जात आहेत. गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग पोलिसांना चक्रावणारा आहे. काही महिन्यांपूर्वी सातपूर येथे खासगी शिकवणी वर्गात दहावीतील दोन विद्यार्थ्यांमध्ये बेंचवर बसण्यावरून वाद झाले होते. एकाने आपल्या मित्रांना बोलावून दुसऱ्या मुलाला बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलाने नशेत ठक्कर बाजार स्थानकाबाहेर भिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या केली.
अंबड भागात एक रुपयाने सिगारेट महाग दिल्याचा राग आल्याने पानटपरीचालकाची हत्या करण्यात आली होती. मागील महिन्यात श्रमिकनगर भागात कामावरून घरी परतणाऱ्या युवकाने पैसे देण्यास नकार दिल्याने टोळक्याने त्याची हत्या केली. पाथर्डी फाटा येथे कॅफेत पाच जणांनी कोयत्याने वार करुन युवकाची हत्या केली होती. नांदूरनाका येथील टोळक्याच्या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक झाली. पंचवटीतील गोळीबाराच्या कटात याच पक्षाचे माजी नगरसेवक जगदिश पाटील यांचा सहभाग निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
नऊ महिन्यांत हत्यांची संख्या ४२ वर पोहोचली. टोळक्यांकडून शस्त्र घेऊन दहशत पसरविण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. टोळ्यांकडून गुन्हेगारीचे उदात्तीकरण होत आहे. त्याचे प्रत्यंतर हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या संशयित महेश सोनवणे उर्फ चिमण्याच्या स्वागत मिरवणुकीतून आले. समर्थकांनी नाशिकरोड कारागृहाबाहेर पुष्पहार घालून जल्लोषात त्याचे स्वागत केले. वाहनांतून मिरवणूक काढली. समर्थकांनी धारदार शस्त्रे मिरवली. अन्य वाहनधारकांना मज्जाव केला. काहींच्या अंगावर ते धावून गेले.
चिमण्याच्या २२ समर्थकांना शोधून पोलिसांनी त्यांची धिंड काढली. श्रमिकनगरमध्ये हत्येच्या गुन्ह्यातील संशयित टोळक्याची वरात काढून दहशत मोडून काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून सराईत गुन्हेगार, टोळ्यांचे म्होरके, अवैध शस्त्र बाळगणारे आदींवर कारवाईचे सत्र अवलंबले गेले असले तरी परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याची नागरिकांची भावना आहे. या बिकट स्थितीमुळे भाजपच्या तीनही आमदारांना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्यासाठी जावे लागले.
चालू वर्षी जानेवारीपासून सप्टेंबर या कालावधीत शहरात झालेल्या सर्व हत्यांची उकल करण्यात आली. शहराच्या लोकसंख्येच्या वाढीनुसार दरवर्षी सर्वच शहरात पाच ते १० टक्के गुन्ह्यात वाढ होत असते. त्याच प्रमाणात ही वाढ आहे. सर्व गुन्ह्यांची उकल करून आरोपींना अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत मकोका, तडीपारी आदी कठोर कारवाई केली जात आहे. – किरणकुमार चव्हाण (उपायुक्त, गुन्हे शाखा, नाशिक पोलीस)
२०२३ मध्ये ४२ हत्या
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालानुसार २०२३ वर्षात नाशिक शहरात ४२ हत्या झाल्या होत्या. प्राणघातक हल्ले (६१), बलात्कार (११९), सोनसाखळी चोरी (१२६), दरोडा (सहा), इतर दरोडा (१४१), हाणामारी (६८), वाहन चोरी (८४०), फसवणूक (२९७), असे विविध प्रकारचे ४५२७ दखलपात्र गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांकडून जुगार प्रकरणी (१४३) आणि प्रतिबंधात्मक (३७२) अशा एकूण १२४९ कारवाया करण्यात आल्या होत्या, असे अहवालात म्हटले आहे.