नाशिक : सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात शेतातील काम आटोपून पायी घरी परतणाऱ्या महिलेबरोबर असणाऱ्या साडेतीन वर्षाच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाला. गोंदे येथील शरद ताबे यांच्या दातली बंधाऱ्याजवळील शेतजमीन सुरेश मेंगाळ हे कसतात. शुक्रवारी मेंगाळ यांची पत्नी शेतात गेली होती. त्यांच्याबरोबर जान्हवी ही मुलगीही होती.
काम आटोपून सायंकाळी मायलेकी घरी परत येत असताना मक्याच्या शेताजवळ बिबट्याने जान्हवीवर हल्ला केला. आईदेखत तिला शेतात फरफटत नेले. त्यांनी आरडाओरड केल्यावर परिसरातील शेतमजुरांनी धाव घेतली. त्यामुळे बिबट्याने पळ काढला. जखमी जान्हवीला त्वरीत सिन्नर येथे दवाखान्यात नेण्यात आले. डाॅक्टरांनी तिचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले. या घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि वावी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.