मनमाड: शहर आणि परिसर हे बिबट्याचे आवडते ठिकाण झाले की काय, अशी शंका उत्पन्न होऊ लागली आहे. मागील पंधरा दिवस मनमाड परिसरात भर वस्तीत शहरात बिबट्याने तळ ठोकला होता. एका बिबट्याला पकडण्यात यश आले. इतर दोन बिबटे अजूनही सापडले नाही. ही घटना ताजी असताना मध्यरात्री मनमाडनजीक श्रीक्षेत्र दत्ताचे शिंगवे येथील दत्त मंदिर प्रांगणात बिबट्याने तब्बल दोन ते अडीच तास तळ ठोकल्याने शिंगवेसह मनमाड परिसरात खळबळ उडाली आहे.

मनमाडपासून अवघ्या दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदवड तालुक्यातील श्रीक्षेत्र दत्ताचे शिंगवे, येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिर परिसरात बिबट्याने रविवारी रात्री तब्बल दोन ते अडीच तास तळ ठोकला. बिबट्याच्या या सर्व हालचाली सीसी टीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. सकाळी छायाचित्र व चित्रफिती प्रसारित झाल्यानंतर शिंगवेसह मनमाड परिसरात ग्रामस्थांमध्ये् भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मंदिर परिसरात बिबट्याचा वावर दोन ते अडीच तास होता. मंदिराच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यात त्याच्या सर्व हालचाली कैद झाल्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने भाविक बाहेर अंगणात झोपलेले होते. मध्यरात्री दोन वाजता बिबट्या आणि कुत्र्यांमध्ये झटापट झाली. त्यामध्ये शेवलेकर परिवाराच्या कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला. त्यानंतर बिबट्या सरळ वरती मंदिरावर गेला. मंदिराच्या पायरीलगत बिबट्या तब्बल दोन तास निवांत बसलेला होता. परिसरातील कोणत्याही व्यक्तीला किंवा जनावराला त्याने त्रास न दिल्याने अनर्थ टळला पण या घटनेमुळे नागरिकांमध्ये आणि परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्रीच या घटनेची माहिती शिंगवे येथील दत्त मंदिर ट्रस्टचे बाबाजी शेवलेकर यांनी पोलीस पाटील अनिल ठोंबरे यांना दिली व वन विभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत असल्याची माहिती प्राध्यापक कृष्णा शेवलेकर यांनी दिली.

मनमाड शहर आणि परिसरात यापूव तीन बिबटे आढळून आले. त्यापैकी एक बिबट्या शीख मंदिरातील मळ्यामध्ये जाळ्यात अडकला . इतर दोन बिबटे मात्र अद्यापही शोधून सापडले नाहीत. त्यांना पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे देखील लावले होते पण काही उपयोग झाला नाही. आता पुन्हा एकदा बिबट्या मनमाडच्या वेशीवर आल्याने नागरिकांत भीती पसरली आहे.