जागतिक पांढरी काठी दिन आणि वाचक प्रेरणा दिन याचे औचित्य साधत अ‍ॅम्वे ऑपरटय़ुनिटी फाऊंडेशन आणि नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड (नॅब) महाराष्ट्र विभाग यांच्या सहकार्यातून राज्यातील पाच जिल्ह्यात नेत्रांग व्यक्तींसाठी ब्रेल ग्रंथालयची अनोखी संकल्पना आकारास येत आहे. त्या संदर्भातील करार नॅब आणि अ‍ॅम्वे यांच्यात झाला असून नेत्रांग व्यक्तींसाठी ध्वनिमुद्रीका व पुस्तकांचा संच असलेले हे ग्रंथालय असणार आहे. डिसेंबर महिन्यात पाचही जिल्ह्यात हे ग्रंथालय सर्वासाठी खुले होईल अशी अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात २०११ मध्ये झालेल्या जनगणना सर्वेक्षणात सहा लाख नेत्रांग व्यक्तीं आढळल्या. या व्यक्ती सक्षम व्हाव्यात, यासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू असले तरी ते त्रोटक स्वरूपात आहेत. यासाठी समांतर पध्दतीने नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड  (नॅब) काम करत आहे. नेत्रांगासाठी विविध उपक्रमांची आखणी करतांना भेडसावणाऱ्या निधीच्या अडचणीचा प्रश्न अ‍ॅमवे कंपनीने सोडविला. जागतिक पांढरी काठी दिन आणि वाचक प्रेरणा दिनाचे औचित्य साधत उभयतांमध्ये करार होऊन ‘ब्रेल ग्रंथालय’ सुरू करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार नेत्रांग व्यक्तींचा विचार केल्यास नाशिक  (२०,०१४), लातुर (१०,०००), अमरावती (२०,११३), सोलापूर (३२,९२९) आणि कोल्हापूर (१६,८५०) अशी संख्या आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यात सुरूवातीला ही ‘ब्रेल लायब्ररी’ सुरू करण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच असा प्रयोग होत आहे.

प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन लाख ७५ हजार असा पाच जिल्ह्यांसाठी तेरा लाख ७५ हजार रुपयांचा स्वतंत्र निधी मंजुर करण्यात आला. या निधीतून ग्रंथालयासाठी आवश्यक किमान हजार ब्रेल पुस्तके, यंत्रणा, ध्वनी मुद्रिका, फर्निचर, जागा आदींचे नियोजन आहे. या प्रकल्पाच्या समन्वयकाची जबाबदारी विनोद जाधव यांच्यावर देण्यात आली आहे. या उपक्रमासाठी अ‍ॅम्वेचे जिग्नेश मेहता, आणि नॅब महाराष्ट्रचे रामेश्वर कलंत्री, गोपी मयूर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी प्रयत्न केले.

ब्रेल ग्रंथालय कसे असेल ?

या ग्रंथालयात साहित्य विश्वातील कथा, काव्यसंग्रह, कादंबरी, स्पर्धा परीक्षेतील पुस्तके यासह अन्य महत्वपूर्ण साहित्य नेत्रांगासह सर्वासाठी खुलेा होणार आहे. ज्यांना वाचायचा कंटाळा आहे, अशा सर्वसामान्य माणसांना ध्वनीमुद्रिकेतून वाचन संस्कृतीचा आनंद घेता येईल. लहान मुलांमध्ये त्या निमित्ताने वाचनाची आवड निर्माण होईल.  डिसेंबर अखेरीस हे अनोखे ग्रंथालय वाचकांच्या सेवेत असेल, अशी माहिती मुनशेट्टीवार यांनी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Library for the blind in 5 maharashtra district
First published on: 15-10-2016 at 04:56 IST