नाशिक – कधीकाळी मुंबईत होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यात स्थानिक पातळीवरून मोठी रसद पुरवली जात असे. तेव्हा मनसेचा नाशिक बालेकिल्ला होता. कालांतराने पक्षाला गळती लागली. आणि हा ओघ कमी होत गेला. यंदा रविवारी मुंबईत आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात मोठी रसद पुरविण्याची तयारी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यातून १० हजार कार्यकर्ते शेकडो वाहनांमधून मुंबईला मार्गस्थ होतील, असा दावा केला जात आहे.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, तयारीची माहिती प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी १५ तालुके आणि शहरातील पंचवटी, नाशिकरोड, मध्य नाशिक, सातपूर व सिडको विभागात दौरे केले. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पुढील काळात नागरिकांच्या प्रश्नांवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करून सत्ताधाऱ्यांना जाब विचारला जाईल, असे पदाधिकाऱ्यांनी सूचित केले. गुढीपाडवा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष आहे. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, महिला प्रदेशाध्यक्ष सुजाता डेरे उपस्थित होेते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहर व जिल्ह्यातून किमान १० हजार पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईत राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी जाणार आहेत. यासाठी ८०० ते १००० वाहनांचा ताफा निघणार आहे. यात बसेस आणि इतर चारचाकी वाहनांचा समावेश आहे. काही कार्यकर्ते रेल्वेने मुंबई गाठतील. रविवारी सकाळी आठ वाजता मनसेच्या राजगड कार्यालयातून वाहने मुंबईकडे निघणार असल्याचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी सांगितले.