नाशिक – नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या समोरील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळा परिसराची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या परिसरात अस्वच्छता असून मद्यपींचा अड्डा आणि असामाजिक प्रवृत्तींचा त्रास वाढत आहे. नाशिकमधील टिळकांचा हा एकमेव पुतळा आहे. महानगरपालिकेची उदासिनता या स्थितीला कारणीभूत ठरल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
नाशिक रोड रेल्वे स्थानकासमोर लोकमान्य टिळकांचा हा पुतळा आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसराची दुर्दशा झाल्याची तक्रार लोकमान्य टिळक उत्सव समिती व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. संध्याकाळी आणि रात्री या परिसरात मद्यपी खुलेआम मद्यपान करताना दिसतात, काही वेळा आरडाओरड, गैरवर्तनाचे प्रकार घडतात. यामुळे महिला व कुटुंबियांना येथून जाणेही धोक्याचे वाटते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. अंधार, सुरक्षा रक्षकांची अनुपस्थिती आणि सीसी टीव्ही नसल्याचा गैरफायदा घेऊन हा परिसर असामाजिक प्रवृत्तींचा केंद्रबिंदू बनत चालल्याकडे संबंधितांनी लक्ष वेधले.
पुतळ्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला असून रंग उडालेला आहे, चौथऱ्याला भेगा पडलेल्या आहेत. राष्ट्रपुरुषाचे स्मारक असूनही त्याची अवस्था अवमान करणारी असल्याची बाब स्थानिकांनी निवेदनातून मनपाच्या नाशिक रोड विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांच्यासमोर मांडली. उपाय योजना करण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे. जेणेकरून नाशिकमधील या एकमेव टिळक पुतळ्याचा सन्मान टिकवून ठेवता येईल, आणि त्याच्या आसपासचा परिसर पुन्हा एकदा प्रेरणास्थळ म्हणून ओळखला जाईल याकडे रोहन देशपांडे, संग्राम फडके, विशाल उपाध्याय, अनंत कुलकर्णी, अभिजीत कुलकर्णी , आदींनी लक्ष वेधले.
रंगरंगोटी, दुरुस्तीची गरज
लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याची त्वरित दुरुस्ती व रंगरंगोटी करावी, परिसरात नियमित स्वच्छता राखणे, विद्युत रोषणाई व सीसीटीव्ही बसवावे आणि पोलिसांची नियमित गस्त ठेवावी, अशी मागणी लोकमान्य टिळक उत्सव समिती व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.