लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : राष्ट्रीय विकास मंडळ, गुणगौरव न्यास यांच्या वतीने आणि नाशिक महानगरपालिका यांच्या सहकार्याने नववर्ष स्वागतासाठी आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात तिसऱ्या दिवशी रविवारी सकाळी गोदाकाठावरील पाडवा पटांगणात महारांगोळी काढण्यात आली. ही रांगोळी ७५ फुट बाय ७५ फुट अशी पाच हजार ६२५ चौरस फुटात भरडधान्याचा वापर करुन साकारण्यात आली आहे.
नववर्ष स्वागतासाठी कार्यक्रमांचे विषय हे नेहमीच राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता, पर्यावरण रक्षण, शिक्षण सेवा, महिला सबलीकरण, गोसेवा, सामाजिक एकता, जनजाती पुनरुत्थान आदी असतात. यावर्षी “स्वदेशी” हा सर्व कार्यक्रमांचा विषय आहे. म्हणूनच भरडधान्य माध्यमातून स्थानिक अन्नाचे महत्त्व अधोरेखित करणारी अनोखी अशी पाच हजार ६२५ चौरस फुटांची महारांगोळी साकारण्यात आली आहे. या महारांगोळीसाठी १२०० किलो नाचणी, ३०० किलो वरई, ४०० किलो बाजरी, १०० किलो मूग, ५० किलो कोदरा, ४०० किलो ज्वारी, २०० किलो राळा, १०० किलो उडीद आणि २०० किलो मसूर अशा एकूण तीन हजार किलो इतक्या भरडधान्यांचा वापर करण्यात आला आहे. महारांगोळी १०० महिलांनी अवघ्या चार तासांत साकारली.
आणखी वाचा-देवळा तालुक्यात आगीमुळे गुरांचा चारा खाक, टंचाईत शेतकऱ्याला फटका
भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघासह २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य (मिलेट) वर्ष म्हणून घोषित केले होते. यानिमित्ताने भरडधान्य, तृणधान्य यांचे आपल्या आहारातील महत्व वाढावे, या हेतूने ही भव्य रांगोळी साकारण्यात आली. या रांगोळीतून “राष्ट्रहितासाठी मतदान करा” हा संदेश देण्यात आला आहे. दोन दिवस महारांगोळी नाशिककरांना बघण्यासाठी ठेवण्यात आली आहे. जास्तीत जास्त नाशिककरांनी प्रदर्शन बघण्यासाठी पाडवा पटांगणावर यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महारांगोळीची रचना नीलेश देशपांडे यांची आहे. महारांगोळी प्रमुख म्हणून आरती गरुड तर सहप्रमुख म्हणून सुजाता कापुरे आणि मयुरी शुक्ला-नवले यांनी जबाबदारी पार पडली. या रांगोळीसाठी तिळभांडेश्र्वर चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल चव्हाण, वास्तूविशारद मिलिंद कुलकर्णी, श्रीकांत वाणी यांचे सहकार्य लाभले. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी युद्धकलेचे प्रात्यक्षिक गोदाकाठावर दाखवण्यात येणार आहे.