नाशिक – नाशिक पूर्व विधानसभेत भाजपकडून उमेदवारीची शक्यता धूसर झाल्याने मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय महापालिकेचे माजी स्थायी सभापती गणेश गिते यांनी राष्ट्रवादीत (शरद पवार) जाण्याचे निश्चित केले आहे. महाविकास आघाडीत नाशिक पूर्वच्या जागेचा तिढा सुटून आपली उमेदवारी निश्चित झाली की, दोन दिवसांत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इच्छुकांच्याा मोठ्या संख्येने भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पाच वर्षात नाशिक पूर्वमध्ये कुठलीही कामे झाली नाहीत. केवळ गुन्हेगारीत वाढ झाली, अशी तोफ डागत गिते यांनी भाजपचे विद्यमान आमदार ॲड. राहुल ढिकले यांना लक्ष्य केले.

हेही वाचा >>> नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले

शहरातील तीनही मतदारसंघात उमेदवारीवरून भाजपमधील अस्वस्थता उघड होत आहे. यामुळे बंडखोरी आणि पक्षात फूट पडण्याची चिन्हे आहेत. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार ॲड. राहुल ढिकले प्रतिनिधित्व करतात. या जागेसाठी भाजपकडून माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी स्थायी सभापती गणेश गिते, उद्धव निमसे यांच्यासह काही प्रबळ दावेदार आहेत. उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याचे दिसताच इच्छुकांनी इतर मार्ग चोखाळण्यास सुरुवात केली आहे. यात गिरीश महाजन यांचे समर्थक गणेश गिते यांचा पहिला क्रमांक लागतो. शुक्रवारी गिते यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. याआधी त्यांची शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांशी दोन-तीनवेळा भेट झाली होती. उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना ही भेट झाल्यामुळे तिकीट वाटपावरून अनेक मतदारसंघात भाजप दुभंगण्याच्या मार्गावर असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

महाविकास आघाडीत शहरातील तीन जागांवर रस्सीखेच आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शहरात तीनही पक्षांनी एकेक जागा लढवावी, अशी सूचना शरद पवार यांनी केली होती. त्यानुसार नाशिक पूर्व मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपकडून ॲड. ढिकले यांची उमेदवारी निश्चित झाल्यास त्यांच्या विरोधात ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार देण्याची रणनीती शरद पवार गटाने आखली आहे.

हेही वाचा >>> निर्मला गावित स्वगृही परतण्याच्या मार्गावर, इगतपुरीतून उमेदवारीसाठी आग्रही

नाशिक पूर्व मतदारसंघ मागील दोन निवडणुकीपासून भाजपने राखला आहे. गतवेळी बाळासाहेब सानप या आमदाराला डावलून पक्षाने मनसेचे माजी आमदार ॲड. राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली होती. ढिकले हे मराठा समाजाचे आहेत. नाशिक पूर्वमध्ये शेतकरी, मराठा समाजातील मतदारांची संख्या मोठी आहे. ही समीकरणे लक्षात घेत शरद पवार गटाने या जागेचा आग्रह धरला आहे. नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या इच्छुकांनी पक्षाच्या आमदारांवर तोफ डागत बंडखोरीचे संकेत दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच वर्षात केवळ गुन्हेगारी वाढली भाजपकडे नाशिक पूर्वमधून उमेदवारीची मागणी केली होती. उमेदवारी न मिळाल्यास आपणास निर्णय घ्यावा लागेल, याचीही कल्पना पूर्वीच वरिष्ठांना दिली होती. महाविकास आघाडीत नाशिक पूर्वच्या जागेचा प्रश्न सुटताच दोन दिवसांत राष्ट्रवादीत (शरद पवार) प्रवेश करणार आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात पाच वर्षात कुठलीही विकास कामे झाली नाहीत. या काळात केवळ गुन्हेगारीत वाढ झाली. – गणेश गिते (माजी स्थायी सभापती, भाजप)