नाशिक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीमध्ये रुजवण्यासाठी येथे अंनिस तसेच समविचारी पक्ष, संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी बुधवारी सकाळी निर्भय मॉर्निंग वॉक फेरी काढली.

अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे अजूनही फरार आहेत. दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध आणि डॉ. दाभोलकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी काढण्यात आलेल्या फेरीला मुंबई नाक्याजवळील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन सुरुवात झाली. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना सामुदायिक गायनाने अभिवादन करण्यात आले.

ही फेरी शहरातील विविध मार्गावरून सीबीएसजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली. उपस्थितांनी यावेळी चळवळीचे गीत गायिले. घोषणा देण्यात आल्या. हुतात्मा स्मारकात समारोप करताना पुन्हा प्रेरणादायी घोषणा देण्यात आल्या. संघटितपणे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणे तसेच हे काम म्हणजे व्यापक समाज बदलाच्या प्रक्रियेची सुरुवात असून याद्वारे शोषणमुक्त, समताधिष्ठित, विवेकी असा मानवतावादी समाज घडवण्याच्या कृतिशील संकल्पाचा सामूहिक वाचनाने निर्धार करण्यात आला.

या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. डी. एल. कराड, महादेव खुडे, संविधानप्रेमी नाशिककर संस्थेचे अजमल खान आणि महाराष्ट्र अंनिसचे नाशिकमधील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी होते.

या वेळी बोलतांना अंनिसचे राज्यप्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनी सांगितले, विचारवंताच्या हत्या करून त्यांचे विचार संपत नाही. तर तेच विचार समाज मोठ्या प्रमाणात स्विकारतो. त्यावर वाटचाल करतो. मात्र त्यासाठी हा विचार कार्यकर्त्यांनी पुढील पिढी पर्यंत रुजवला पाहिजे.