नाशिक – औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी शिक्षण घेतल्यानंतर त्याच परिसरात काम करतात. अशा विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे प्रशिक्षण दिल्यास संभाव्य धोके टाळता येतील. या संकल्पनेतून महावितरणच्या सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राने आयटीआयच्या विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे धडे देण्यास सुरूवात केली आहे.
महावितरणच्या सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादीकर यांनी प्रथमच अशाप्रकारचे प्रशिक्षण घेण्याचे निर्देश दिले आहेत. कार्यकारी अभियंता प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण होणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे धडे देण्यासाठी महावितरणच्या एकलहरेस्थित प्रशिक्षण व सुरक्षा विभागाच्या पुढाकाराने विद्युत सुरक्षा मार्गदर्शनपर कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत सिन्नर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मार्गदर्शनपर कार्यशाळा पार पडली. यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता (सुरक्षा) डॉ. जितेंद्रकुमार राठौर यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना विद्युत सुरक्षा विषयक मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत विद्युत अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, नादुरुस्त उपकरणांपासून होणारे धोके, शॉर्टसर्किटमुळे लागणारी आग, पावसाळ्यात विद्युत वितरण यंत्रणेपासून सुरक्षित अंतर , घरातील वायरिंग सुरक्षित ठेवणे, एकाच ठिकाणी अनेक उपकरणे न जोडणे आणि आरसीसीबीसारखी सुरक्षा उपकरणे वापरणे इत्यादी बाबींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देवून त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
अपघात प्रसंगी घ्यावयाची खबरदारी, विजेचा धक्का बसल्यास प्रथमोपचार, प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना कनिष्ठ अभियंता अफसर शेख यांनी प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. विद्यार्थी हेच पुढील काळातील विद्युत सुरक्षा दूत ठरणार आहेत, असे डॉ. जितेंद्रकुमार राठौर यांनी सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य एस. एम. आथरे यांनी केले. पर्यवेक्षक बी. एस. गडाख, उपकार्यकारी अभियंता राकेश फिरके, गट निदेशक के. व्ही. वाकचौरे यांची उपस्थिती होती.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेविषयी जागरुक करण्यासाठी या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जाते. औद्योगिक परिसरातील तांत्रिक प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन हवे असल्यास, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता (सुरक्षा), प्रशिक्षण व सुरक्षा नाशिक, डॉ. जितेंद्रकुमार राठौर (७७६८०००१२७ ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणच्या सुरक्षा व प्रशिक्षण विभागाने केले आहे.