नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवाराचे नाव अद्याप अंतिम झाले नसले तरी गुरुवारी नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन करून वाजतगाजत अर्ज भरण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रथ सजविण्यापासून झेंडे, पाण्याची व्यवस्था यावर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा करण्यात आली. दोन्ही मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन विक्रम रचतील, असा विश्वास भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

महायुतीतील पदाधिकाऱ्यांची भाजप कार्यालयात महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बैठकीत उमेदवार कोण, त्याचे नाव काय, याची चर्चा झाली नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. उमेदवाराविषयीचा अंतिम निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये होईल. महायुतीत उमेदवाराच्या नावाला महत्व नाही. कुणाचेही नाव आले तरी सर्व पक्ष एकदिलाने काम करतील. बुधवारी महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांचा अवधी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या फेरीच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. नाशिकमध्ये उमेदवार निश्चितीस उशीर झाला म्हणून काही फरक पडत नाही. भाजपचे संघटनात्मक काम उत्कृष्ट आहे. या ठिकाणी २५ ते ३० हजार कार्यकर्त्यांचे जाळे आहे. जागा आणि उमेदवारी कुणालाही मिळाली तरी अंतिम हेतू निवडणूक जिंकणे हा आहे. मागील वेळेपेक्षा महायुती जास्त मते घेऊन विजयी होईल, असा दावा त्यांनी केला. महायुतीतील छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असून त्यांना जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक परिस्थितीची माहिती आहे. त्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचे महाजन यांनी नमूद केले. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रचारात वापरल्या जाणाऱ्या भाषेविषयी महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. राजकारणाचा स्तर किती खाली नेणार, असा प्रश्न त्यांनी केला.

हेही वाचा : सिद्धेश्वरानंद महाराजांकडे दीड कोटींची संपत्ती, सोन्याचा मुलामा असणारे पावणेतीन लाखाचे घड्याळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माघारीसाठी शांतिगिरी महाराजांची मनधरणी

शांतिगिरी महाराजांशी आपण दुपारी चर्चा केली. त्यांच्या उमेदवारीमुळे मतांचे विभाजन होऊन महायुतीला फटका बसू शकतो. त्यामुळे महाराजांनी माघार घ्यावी म्हणून विनंती करण्यात आली. परंतु, त्यांची निवडणूक लढविण्याची मानसिकता आहे. माघारीला वेळ असून त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली जाईल, असे महाजन यांनी नमूद केले.