नाशिक : मकरसंक्रांतीच्या दिवशी नाशिक येथे पतंगोत्सवात प्रतिबंधित नायलॉन मांजा दुचाकीस्वार युवकाच्या गळ्यात अडकल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. ज्या कारणाने ही दुर्घटना घडली, त्या मांजाच्या वापरकर्त्याला अटक करून कठोर कारवाई करावी, त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याची भूमिका कुटंबियांनी घेतल्याने नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात तणावाची स्थिती निर्माण झाली.

सोनू धोत्रे (२३, शिंगवेबहुला, चारणवाडी, देवळाली कॅम्प) असे या युवकाचे नाव आहे. नाशिक जिल्ह्यात मकरसंक्रातीला पतंगोत्सव उत्साहात साजरा केला जातो. पतंगोत्सवात नायलॉन मांजा वापरास बंदी आहे. तरीदेखील त्याचा होणारा वापर युवकाच्या जिवावर बेतला. नायलॉन मांजा अडकून मागील काही दिवसांत अनेक दुचाकीधारक जखमी झाले. संक्रातीच्या दिवशी ही दुर्घटना घडली. सोनू धोत्रे हा युवक सकाळी साडेनऊ वाजता दुचाकीने पाथर्डी फाटा-वडनेरमार्गे प्रवास करत होता. निर्मलबाबा दर्गाजवळ नायलॉन मांजा अडकल्याने त्याच्या गळ्यास गंभीर दुखापत झाली. मामा सुनील जाधव यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. मयत सोनू संक्रातीसाठी गुजरातहून नाशिकला घरी आला होता. दोन दिवसांपूर्वी त्याचे लग्न ठरले होते. मे महिन्यात विवाहाची तारीख निश्चित झाली होती. या घटनेमुळे कुटूंबियांना धक्का बसला. या दुर्घटनेला कारक ठरलेल्या नायलॉन मांजाच्या वापरकर्त्यास अटक करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कुटूंबियांसह नातेवाईकांनी लावून धरली. संशयितास अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. पोलिसांकडून संबंधितांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा…नंदुरबार जिल्ह्यातील परिचारिकेच्या हत्येची उकल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारवाई होऊनही नायलॉनचा वापर कायम

पतंगोत्सवात प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून हद्दपारी आणि या मांजाने पतंग उडवणाऱ्या मुलांसह त्यांना नायलॉन मांजा खरेदी करुन देणाऱ्या पालकांवर थेट सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करीत कारवाईचे सत्र राबवूनही त्याचा वार कायम राहिल्याचे समोर आले.