लोकसत्ता वार्ताहर

मालेगाव: पावसाच्या पाण्यापासून रहिवाश्यांना त्रास होऊ नये म्हणून पावसाळ्यापूर्वी शहरातील प्रमुख नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासक तथा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी त्यातील काही ठिकाणांना शहर अभियंता कैलास बच्छाव यांच्यासह भेटी देत हे काम युध्दपातळीवर हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. यात कुचराई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही, असा इशारा गोसावी यांनी दिला आहे.

या संदर्भात आयुक्त गोसावी यांनी विभागप्रमुखांची बैठकही घेतली. बैठकीत प्रामुख्याने शहरातील ४५ नाल्यांची प्रभावी स्वच्छता करण्यासह जंतुनाशकांची फवारणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रारंभी गोसावी यांनी स्वच्छता विभागाकडून समस्या जाणून घेतल्या. शहरातील प्रमुख नाले, गटारींची साफसफाई तसेच जंतुनाशक फवारणीच्या नियोजनाबाबत काही अडचणी असल्यास स्वच्छता निरीक्षकांनी तत्काळ वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन समस्यांचे निवारण करावे, अशी सूचना गोसावी यांनी केली.

हेही वाचा… गोदावरी पात्रालगत ४०० किलो कचरा संकलित

नालेसफाई बरोबरच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुरळणी तसेच हातपंपाद्वारे जंतुनाशक फवारणीची विशेष मोहीम राबविणे, दैनंदिन साफसफाई, जंतुनाशक फवारणी याकडेही काटेकोरपणे लक्ष देण्यावर गोसावी यांनी भर दिला. या कामात निष्काळजीपणा होता कामा नये,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा… नाशिक : दामदुप्पट परताव्याचे आमिष; गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा

बैठकीस शहर अभियंता कैलास बच्छाव, सहायक आयुक्त सचिन महाले, प्रमुख स्वच्छता निरीक्षक आनंदसिंग पाटील, एकबाल जान मोहम्मद, स्वच्छता निरीक्षक प्रेम शिंदे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर नवीन बसस्थानक, अन्सार नाला, जाफरनगर नाला, हॉटेल महेजबानजवळील नाला आदी ठिकाणी गोसावी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांच्या सूचना जाणून घेतल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रभागनिहाय नाल्यांची संख्या

बैठकीत शहरातील ज्या ४५ नाल्यांची सफाई करण्यावर चर्चा झाली. त्यात प्रभाग एकमध्ये ५ नाले, प्रभाग दोनमध्ये १० नाले, प्रभाग तीनमध्ये १५, प्रभाग चारमध्ये १५ नाल्यांचा समावेश आहे.