मालेगाव : अटकेत असलेल्या संशयित आरोपीला जामीन मिळवून देण्याच्या दृष्टीने मदत करण्यासाठी आरोपीच्या नातेवाईकांकडून ३५ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून रंगेहात पकडले आहे. विशेष म्हणजे नेमणुकीस असलेल्या पोलीस ठाण्यातच लाच स्वीकारण्याचे हे धाडस संबंधित हवालदाराने केले आहे. या हवालदारास अटक करण्यात आली आहे.
नयन परदेशी (३५) असे अटक करण्यात आलेल्या संशयित हवालदाराचे नाव आहे. या सापळ्यातील तक्रारदार यांच्या भावाविरोधात मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील तपासाच्या अनुषंगाने तसेच लवकर जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्याची खात्री देत नयन याने ३५ हजाराची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. ही लाच देण्याचे मान्य असल्याचे भासवत तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्यासंदर्भात तक्रार केली होती.
या तक्रारीनुसार पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पूनम केदार, हवालदार गणेश निंबाळकर,अंमलदार नितीन नेटारे व नाईक परशुराम जाधव यांच्या पथकाने शनिवारी रात्री तालुका पोलीस ठाण्यात सापळा रचला. या सापळ्यात पोलीस ठाण्यातील संगणक कक्षात ३५ हजाराची रोकड स्वीकारताना नयन हा अलगद सापडला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात याच पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या तीन आठवड्यात मालेगाव येथे लाचखोरांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा यशस्वी करण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यात विजेच्या नवीन जोडणीसाठी ५० हजाराची लाच स्वीकारताना मालेगाव पाॅवर सप्लाय लिमिटेड या खाजगी वीज वितरण कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला पकडण्यात आले होते. तेव्हा लाचेची ही रक्कमदेखील वीज कंपनीच्या कार्यालयातच स्वीकारली गेली होती. कुठलाही धाक न बाळगता चक्क आपल्या कार्यालयातच लाच स्वीकारण्याच्या या दोन्ही घटनांवरून लाचखोर किती मुजोर बनत चालले आहेत, याचीच प्रचिती येत आहे. दरम्यान, भ्रष्टाचारासंदर्भात नागरिकांकडे काही माहिती असल्यास किंवा लोकसेवकांकडून लाच मागणीचा प्रयत्न होत असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे.