मालेगाव : असमाधानकारक पावसामुळे सध्या निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मालेगाव शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेस फटका सहन करावा लागत आहे. गिरणा आणि चणकापूर या दोन्ही धरणांमधील आरक्षित पाणीसाठा देखील मर्यादित असल्यामुळे महापालिका प्रशासनाला आता पाणी कपातीत वाढ करावी लागली आहे. त्यानुसार एक सप्टेंबरपासून शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे.

पावसाळी हंगामाचे तीन महिने संपत आले तरी अनेक भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. तसेच तब्बल महिन्याभरापासून पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे सर्वत्र टंचाईसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाची चिन्हे दिसत नसल्याने येत्या काळात ही परिस्थिती अधिक चिंताजनक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चणकापूर आणि गिरणा या दोन्ही धरणांमध्ये पुरेसा जलसाठा होऊ शकलेला नाही.

हेही वाचा : नाशिक: लेखक तुमच्या भेटीला उपक्रमास शनिवारपासून सुरुवात; अशोक पत्की, संदीप खरे, नरसय्या आडाम यांचाही समावेश

या धरणांमधून मालेगाव शहरासाठी आरक्षित असलेला जलसाठा मर्यादित असून ऑक्टोबर महिन्याअखेर हे पाणी पुरविण्याची कसरत महापालिकेस करावी लागणार आहे. त्यामुळे संभाव्य टंचाईला तोंड देण्यासाठी दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेत त्याचे नियोजन पालिका प्रशासनाने सुरु केल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी दिली. सद्यस्थितीत शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईसदृश्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्याला नागरिकांनी सहकार्य करावे आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहनही गोसावी यांनी केले आहे.

हेही वाचा : बहुचर्चित १५ खाणपट्टाधारकांचे वाहतूक परवाने बंद, जिल्हा प्रशासनाचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाण्याची नासाडी करणाऱ्यांना तंबी

पाणी कपातीचा निर्णय घेण्यासह पाण्याची नासाडी टाळण्यासाठीही पालिका प्रशासन सजग झाले आहे. त्यासाठी ज्या घरमालकांनी नळांना तोट्या लावलेल्या नसतील, त्यांनी तत्काळ तोट्या बसवून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जे लोक नळाचे पाणी रस्त्यावर अथवा गटारीत सोडतात किंवा जे लोक नळाच्या पाण्याने वाहने धुण्याचे कृत्य करतात, त्यांनाही पालिकेने तंबी दिली आहे. पाण्याची अशी नासाडी करण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी दिला आहे.