मालेगाव : वारंवार घडणाऱ्या गोळीबाराच्या घटना, चोऱ्या तसेच भ्रमणध्वनी, सोनसाखळी खेचण्याचे प्रकार शहरात नित्याचे झाले असतानाच गुरुवारी रात्री नानावटी पेट्रोल पंपाजवळ अत्यंत गजबजलेल्या जुना राष्ट्रीय महामार्गावर मोतीबाग नाका भागात युवकाची दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी हत्या केल्याने मालेगाव हादरले. तिघा मारेकर्यांनी धारदार शस्त्र व लाकडी दांडक्याने या तरुणावर आधी हल्ला केला. नंतर डोक्यात दगड घालून हत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.
नितीन निकम (२५) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री रस्त्याच्या कडेला तो उभा असताना दुचाकीवरून तीन जण तेथे आले. हातातील लाकडी दांडके आणि धारदार शस्त्राने नितीनवर त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तो जमिनीवर कोसळला. नंतर मारेकऱ्यांनी जवळच पडलेला दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला. हल्ल्यानंतर तिघे मारेकरी दुचाकीवर बसून पसार झाले. हल्ल्यात नितीनचा जागीच मृत्यू झाला.
हल्ल्याची माहिती समजताच छावणी पोलीस टनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. त्यानुसार सचिन अहिरे, परेश पगारे आणि केतन अहिरे (तिघे रा. मालेगाव) यांना ताब्यात घेतले. हत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.
काही दिवसांपासून शहर परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. गोळीबाराच्या घटना, चोऱ्या यामुळे मालेगावकर त्रस्त झाले आहेत. हे गुन्हे रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर असतानाच महामार्गावर हत्येची घटना घडली. सीसीटीव्हीतील हत्येचे चित्रण बघितल्यावर शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती कोणत्या थराला गेली, यावर प्रकाश पडत आहे. गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांबद्दल शहरवासीयांमध्ये भीती तसेच चिंतेचे वातावरण आहे. शहरातील बिघडत चाललेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.