नाशिक : राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांचे विधिमंडळ सभागृहात कथित ऑनलाईन रमीचे प्रकरण गाजत असताना आता पुणे जिल्ह्यातील खानापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेले एक पत्र समाजमाध्यमात प्रसारित झाले आहे. जुन्नर तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीत कॅसिनो क्लब सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी त्यांनी उपरोधिकपणाने केल्याने याचा कोकाटे यांच्या कथित रमी प्रकरणाशी संबंंध जोडला जात आहे.
विधिमंडळ सभागृहात भ्रमणध्वनीवर कृषिमंत्री कोकाटे हे रमी खेळत असल्याची चित्रफित आमदार रोहित पवार यांनी प्रसारित केल्यापासून कोकाटे यांच्यावर विरोधकांसह शेतकरी संघटनांकडून चौफेर टीका होत आहे. आपल्याला ऑनलाईन रमी खेळताच येत नाही, असा पवित्रा घेऊन कोकाटे यांनी भ्रमणध्वनी क्रमांक आणि बँक खाते संलग्न असल्याशिवाय ऑनलाईन रमी खेळता येत नसल्याचा दावा केला.
या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी करीत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले आहेत. या घटनाक्रमात समाजमाध्यमांवर पुणे जिल्ह्यातील खानापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुकुंद भगत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेले पत्र प्रसारित झाले. ते खरे की बनावट याची स्पष्टता झाली नसली तरी कोकाटेंच्या ऑनलाईन रमी प्रकरणाशी त्याचे धागेदोरे जोडले जात आहेत.
राज्यात दररोज वेगवेगळे जुगाराचे ॲप दाखल होत आहेत. यात खूप मोठा उद्योग दडलेला आहे. न्यायालय, शासकीय कार्यालय, महाविद्यालयात सगळीकडे लोकांना मस्तपैकी जुगार खेळता येतो. त्यामुळे आपल्या दाजींची मोठी प्रगती झाली असून त्यांनी वडिलोपार्जित जमीन विकून घरातील भांडी विकण्यास काढली असल्याकडे पत्रात लक्ष वेधण्यात आले. दाजींना लुबाडणारे ॲप कररूपाने शासनाला काही रक्कम देत आहे. या कार्यात साथ देण्यासाठी ग्रामपंचायतीत कॅसिनो क्लब चालू केला तर तरूण वर्गाच्या हाताला काम वाढेल आणि बेरोजगार असल्याची भावना राहणार नाही, असे उपसरपंच भगत यांनी पत्रात म्हटले आहे.
ऑनलाईन जुगारावर आक्षेप
प्रत्यक्ष खेळणाऱ्या जुगारात त्यातील कोणातरी व्यक्तीकडे पैसे जातात. तरी जुगार वाईटच. त्यावर बंदी आहे. परंतु, हे संगणकीय ॲप सगळ्यांना लुबाडून स्वत:ची भरती करतात. करोडो रुपये खेळाडू, अभिनेत्यांना देऊन राजरोस जाहिराती करून लूट करीत असताना शासन व लोकप्रतिनिधी हे सर्व चालू देत असल्याचा पत्रात उल्लेख आहे. आमच्या ग्रामपंचायतीला कॅसिनो क्लबची परवानगी मिळावी, जेणेकरून तरुणांना कामधंदा भेटेल. राहिलेली शेती विकून लोक भिकेला लागतील, अशी उपरोधिक टीका करीत ऑनलाईन जुगारावर आक्षेप घेतला गेला आहे.