मनमाड : गहाण ठेवलेल्या २६२५ कापूस गाठींची परस्पर विक्री करून श्रीरामपूर येथील एका पतसंस्थेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मनमाड पोलिसांनी सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. संशयितांमध्ये वखार महामंडळाच्या तत्कालीन व्यवस्थापकाचाही समावेश आहे.

याबाबत आण्णासाहेब जाधव (५६, गुजरानी मळा, श्रीरामपूर) यांनी मनमाड पोलिसांकडे तक्रार दिली. चार ते २० फेब्रुवारी या कालावधीत ही घटना घडली. फेब्रुवारी २०२५ पर्यंत वेळोवेळी श्री बालाजी ऑईल मीलचे रायभान बावके (साकुरी, अहिल्यानगर), महेश मगर (टाकळीभान, श्रीरामपूर), प्रशांत कासार (रांजणगाव, तिघेही रा. अहिल्यानगर), सागर बावके (साकुरी), प्रल्हाद चौधरी आणि महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापक यांनी संगनमताने अंबिका महिला नागरी पतसंस्थेकडे गहाण असलेल्या २६२५ कापूस गाठींची परस्पर बेकायदेशीर विक्री करून अंबिका महिला नागरी पतसंस्थेची आर्थिक फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. ही पतसंस्था श्रीरामपूर येथे आहे. तक्रारदार हे पतसंस्थेचे व्यवस्थापक आहेत.

मनमाड येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात गहाण ठेवलेल्या २६५० कापूस गाठी सुरक्षित असल्याची खोटी माहिती पतसंस्थेला दिली. पतसंस्थेचे व्यवस्थापक आणि कर्मचारी हे मनमाड येथील गोदामात कापूस गाठीची पाहणी करण्यासाठी गेले असता तेथील अधिकाऱ्यांनी पाहणी करण्यास विरोध केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर बालाजी ऑईल मिल यांचा कापूस गाठी ठेवलेला उतारा पाहिला असता, तारणाखाली असलेल्या २६५० गाठींपैकी २६२५ गाठींची परस्पर विक्री केल्याचे दिसून आले, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मनमाड पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.