लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निधीसाठी फिरावे लागणार असून यासाठी पदाधिकारी आणि समितीप्रमुखांनी प्रयत्न करावा, असे आवाहन संमेलनाचे आयोजक मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी केले आहे. संमेलनासाठी आता खूपच कमी कालावधी राहिल्याने उर्वरित दिवसांमध्ये आयोजन समितीतील मंडळींनी सक्रिय सहभाग नोंदविण्याची सूचनाही जोशी यांनी केली. अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन ते चार फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. संमेलन यशस्वी होण्यासाठी आयोजक मराठी वाङ्मय मंडळ आणि विविध क्षेत्रांतील पदाधिकार्यांची आढावा बैठक झाली. मंडळाचे अध्यक्ष डॉ. जोशी यांनी मार्गदर्शन केले.

संमेलनासाठी प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य अशी साने गुरुजी साहित्यनगरी उभारण्याचे काम सुरू झाले आहे. मैदानाची स्वच्छता आणि व्यवस्था आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. प्रतिनिधी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असून निवासव्यवस्था पुरेशी आहे, असे डॉ. जोशी यांनी सांगितले. यावेळी कविसंमेलन, कविकट्टा, गझलकट्टा, नाट्यप्रवेश याबाबत प्रत्येक समिती पदाधिकार्यांनी आढावा सादर केला. बैठकीला मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-सारंगखेडा पोलीस निरीक्षकासह दोघे लाच घेताना जाळ्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संमेलनासाठी पाच ते साडेपाच कोटींची गरज आहे. त्यात शासनाकडून दोन कोटींची घोषणा झाली आहे. निधी संकलन सुरू असून, त्यासाठी पावतीपुस्तिकाही छापण्यात आल्या आहेत. मराठी वाङ्मय मंडळाचे पदाधिकाऱ्यांकडून निधी संकलनासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पदाधिकारी भय्यासाहेब मगर यांनी दिली.