नाशिक – शेतमालाला अत्यल्प भाव, वनजमिनींचा प्रश्न, गॅस दरवाढ यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या वतीने मुंबईत विधान भवनावर धडक देण्यासाठी रविवारी दिंडोरी येथून निघालेला मोर्चा सोमवारी शहरात पोहोचला. शेतमालाला भाव मिळत नसल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोर्चेकऱ्यांनी शहरातील बस स्थानकासमोर रस्त्यावर भाजीपाला फेकला.

संपूर्ण राज्यात शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी, श्रमिकांवर जीवघेणी परिस्थिती ओढावली आहे. सरकारच्या श्रमिकविरोधी व भांडवलशाही धार्जिण्या धोरणांमुळे शेती मालाचे भाव कोसळत आहेत. आदिवासी बांधवांना आजही मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करावा लागत आहे. याचा जाब विचारण्यासाठी माकप तसेच समविचारी संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे. रविवारी दिंडोरीपासून निघालेला मोर्चा सोमवारी नाशिक शहरात येऊन पोहोचला. मोर्चेकरी पंचवटीतील निमाणी बस स्थानक परिसरात आले असता कांदा, टोमॅटो, कोथिंबिर, वांगे आदी भाजीपाला रस्त्यावर फेकत संताप व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी आंदोलकांची भेट घेत संवाद साधला. पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी विधानभवनाला घेराव घालण्यासाठी मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

हेही वाचा – VIDEO : येवल्यात रंगपंचमीनिमित्त रंगांच्या सामन्यांचा उत्साह

माजी आमदार जिवा पांडू गावित यांच्याशी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री भुसे यांनी संपर्क साधला. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळात मागण्यांबाबत निर्णय झाल्याशिवाय हा मोर्चा थांबणार नाही, असे गावित यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – धुळे : धावत्या मालमोटारीला आग; चिकू, द्राक्षांचे नुकसान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोर्चेकऱ्यांच्या मागण्या

  • कांद्याला उत्पादन खर्चावर आधारीत किमान आधारभूत भाव देण्याचे धोरण जाहीर करावे.
  • कर्जमाफ करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.
  • नैसर्गिक आपत्तीत झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई एन.डी.आर.एफ. मधून तत्काळ द्यावी.
  • वाढत्या महागाईमुळे प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान एक लाख ४० हजारांवरून ५ लाख रुपये करावे, आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या.