नाशिक – इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रातील वीज दर जास्त आहेत. त्याचा औद्योगिक विकास, नवीन गुंतवणुकीवर परिणाम होत आहे. या बाबी समोर आल्यानंतर औद्योगिक क्षेत्रातील वीजदर कमी करण्यासंदर्भात ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि आ. सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत विचार विनिमय झाला.
आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) तसेच महावितरण, महापारेषण, विद्युत निरीक्षक आदी विभागाचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांसमवेत मुंबईत बैठक पार पडली. त्यात उद्योजकांना भेडसावणारे विविध प्रश्न तसेच अडचणीं संदर्भात सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रासाठीचे विजेचे दर हे इतर राज्यांच्या तुलनेने जास्त आहेत. उद्योजकांना त्याचा चांगलाच फटका बसतो. नवीन गुंतवणुकीवरही त्याचा परिणाम होतो. वीज नियामक आयोगाच्या नवीन दरवाढीनुसार तर, राज्यातील औद्योगिक व व्यापारी दर अधिकच वाढले आहेत. त्यामुळे या संदर्भात तसेच विजेच्या संदर्भातील अन्य अडचणींवर सर्वसमावेशक तोडगा काढावा, अशी मागणी निमाचे अध्यक्ष आशिष नहार आणि पदाधिकाऱ्यांनी केली होती,
यावर लवकरच महाराष्ट्रातील उद्योजकांचे प्रतिनिधी आणि संबंधित संस्थांचे अधिकारी यांच्या संयुक्त अभ्यास गटाची निर्मिती करण्यात येईल व त्यांनी तयार केलेला अहवाल अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांना सादर करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. निमाचे अध्यक्ष आशिष नहार व मास्माचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी यावेळी नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांचे विजेच्या संदर्भातील प्रश्न मांडले. सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देत असताना मात्र आयोगाच्या नवीन वीजदरानुसार ज्यांनी यापूर्वी सौर प्रकल्प उभारला आहे, असे सर्व ग्राहक अडचणीत आले आहेत. नवीन विस्तार सुद्धा खुंटणार आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले. अर्थसंकल्पीय अधिवेशन तसेच पावसाळी अधिवेशनातही हा विषय आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडला आणि त्याचे पडसाद उमटले होते. याची आठवण नहार यांनी बैठकीत करून दिल्यानंतर त्याची गांभीर्याने दखल घेतल्याचेही सांगण्यात आले.
मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या समवेत सकारात्मक चर्चा झाल्याने औद्योगिक वीजदर कमी होण्याबाबत उद्योजकांच्या आशा उंचावल्या आहेत. तसेच विजेसंदर्भातील नवीन पायाभूत सुविधांसह अन्य समस्या सुटण्याचा मार्ग सुकर झाल्याचे नहार यांनी नमूद केले. बैठकीतील चर्चेत निमाचे अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनिष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, ऊर्जा समिती अध्यक्ष मिलिंद राजपूत, मास्मा असोसिएशनचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, शशिकांत वाकडे, सुधन्व कुलकर्णी तसेच महावितरणचे संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी, संचालक सचिन तालेवार, कार्यकारी संचालक दिनेश अग्रवाल, धनंजय औंदेकर, दत्तात्रय पडळकर, नाशिक विभाग मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता राजेश थूल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.