जळगाव – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीतील जागा वाटपाचा अंतिम निकष अद्याप ठरलेला नाही. त्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. ज्या जागांवरील उमेदवार आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढले आणि विजयी झाले, त्या जागा आमच्याच राहतील. सामंजस्याने तोडगा न निघाल्यास मैत्रीपूर्ण लढतींचाही विचार केला जाऊ शकतो, असा दावा भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुका भाजपसह शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांकडून महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाणार की स्वबळावर, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी जळगावमध्ये भूमिका स्पष्ट केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका आम्ही महायुतीच्या माध्यमातूनच लढण्याचा प्रयत्न करणार आहोत. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आमच्यात एकमत आहे, असे मंत्री महाजन यांनी पत्रकारांना सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते आणि काही मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, या चर्चांना गिरीश महाजन यांनी फेटाळून लावले. आमच्यामध्ये कुठेही कोणतीही नाराजी नाही. नुकतीच महायुतीच्या सर्व पक्षनेत्यांची बैठक झाली. मी स्वतः त्या बैठकीला उपस्थित होतो. कोणत्याही नेत्याकडून नाराजीचा सूर जाणवला नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले. थोडीफार कुरबुर ही सर्वच पक्षांमध्ये असते. ती आमच्या पक्षात आणि मित्र पक्षांमध्येही आहे. पण नाराजी नाही. नाराजी केवळ माध्यमांमधून दिसते. प्रत्यक्षात महायुतीमधील सर्वच घटक एकजुटीने काम करत आहेत, असेही मंत्री महाजन यांनी नमूद केले.