जळगाव : माझे वडील शिक्षक होते. त्यांना जाऊन आता २५ वर्षे झाली आहेत. तुम्हाला काय अडचण आहे ? तुमच्याकडे जे चालले आहे ते आधी सावरा. मी कुठे चोऱ्या माऱ्या केलेल्या नाहीत. तुम्ही काय काय केले आणि काय चालले आहे, हे सर्वांना माहिती आहे, अशी टीका भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील दोन मोठे राजकीय नेते म्हणजे मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे. दोघे भाजपमध्ये असताना कालांतराने दोघांमध्ये बिनसले. तेव्हांपासून दोघांमधील राजकीय शत्रूत्व दिवसेंदिवस वाढतच गेले आहे. एकमेकांवर आरोप करण्याची, टीका करण्याची एकही संधी दोघे सोडत नाहीत. दोघांच्या या शाब्दिक युध्दात जिल्ह्यातील इतर राजकीय पक्षांची चांगलीच करमणूक होते.

मी मोठ्या जमीनदाराचा मुलगा असून, माझ्याकडे वडिलोपार्जित भरपूर शेती आहे. त्यांचे वडील साधे शिक्षक असताना ते इतके मोठे कसे झाले, असा प्रश्न उपस्थित करून आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री महाजन यांच्यावर मुक्ताईनगरात बरेच काही आरोप केले होते. खडसे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, मी वैयक्तिक महामार्गालगत जागा घेण्याच्या आणि मुरूम चोरण्याच्या गोष्टी करत नाही. तसे काही असेल तर त्यांनी ते दाखवावे, असे आव्हान महाजन यांनी दिले.

जळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना भूसंपादनाच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काय बोलले ते सांगू का सर्वांना ? संपूर्ण राज्याला माहिती आहे, की कोण तुरूंगात गेले तसेच कोण चोऱ्या करत आहे आणि दिल्लीला जाऊन कोण माफी मागून लोटांगण घालत आहे, असा टोला मंत्री महाजन यांनी खडसे यांना हाणला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील वकील विपुल दुषिंग यांच्याविषयी बोलताना जो त्या वकिलाच्या चार कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करणार असल्याचे वक्तव्य केले. त्याविषयी प्रतिक्रिया देताना, त्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत. कदाचित त्यांना पक्षाने तो अधिकार दिलेला दिसतो, अशी खोचक टीका देखील मंत्री महाजन यांनी रोहिणी खडसे यांच्यावर केली.