जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती होणार की नाही होणार, याची कोणीच शाश्वती द्यायला तयार नाही. भाजपसह शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस स्वबळाचा नारा देताना दिसत आहे. तशात शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या संभाव्य उमेदवारांसदर्भात मोठे विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

राज्यात महायुतीचे सरकार असताना जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका युतीच्या माध्यमातून लढायच्या की स्वबळावर, या बाबतीत अद्याप वरिष्ठ पातळीवर निर्णय झालेला नाही. तत्पूर्वीच, मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमधील पक्षाच्या बैठकांमध्ये जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, महापालिका आणि नगरपालिकांवर भाजपची एकहाती सत्ता मिळविण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आतापासून तयारीला लागण्याचे आवाहन करून टाकले आहे. जिल्ह्यातच नाही तर उत्तर महाराष्ट्रात भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा दावा देखील मंत्री महाजन यांनी केला आहे.

जळगाव महापालिकेत कोणत्याच पक्षाचे नगरसेवक नसतील, तेवढे भाजपचे असतील. राज्यात कोणत्याच पक्षाकडे नसतील तेवढ्या नगरपालिका जिल्ह्यात भाजपकडे असतील. आणि हाच कित्ता भाजपला जिल्हा परिषदेत आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये गिरवायचा आहे. मतदार आपल्या बाजुने असताना तुम्ही मागे वळून बघू नका, असा कानमंत्र देखील त्यांनी भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना दिला आहे.या पार्श्वभूमीवर, आपल्यासाठी लोकसभेसह विधानसभेत राबणाऱ्या कार्यकर्त्यांना साथ देण्याची वेळ आली असताना त्यांना पाडण्यासाठी आता प्रयत्न करावे का, असा प्रश्न शिवसेनेसह (एकनाथ शिंदे) राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. युती झाली नाही तर कार्यकर्ते मरून जातील, अशी भीती शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी खुद्द व्यक्त केली आहे. मात्र, दोन्ही पक्षांना भाजपकडून युती करण्यासंदर्भात अद्याप कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही.

दरम्यान, युती झाली तरी भाजपकडून मित्र पक्षांच्या वाट्याला फार जागा येण्याची शक्यता नसल्याने शिंदे गटासह अजित पवार गटाने आपापल्या स्तरावर संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यास दोन दिवसांपासून सुरूवात केली आहे. समोर भाजपसारखा ताकदीचा पक्ष उभा ठाकल्यास आपले उमेदवारही तितक्याच ताकदीचे असावेत म्हणून दोन्ही पक्ष सक्षम उमेदवारांचा शोध घेत आहेत.

शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिवाळीच्या निमित्ताने आपल्या मिश्किल शैलीत त्यास दुजोरा देखील दिला. आमच्या सगळ्याच उमेदवारांचे बॉम्ब (फटाके) तयार आहेत. परंतु, त्यापैकी काही बॉम्ब वेळेवर वाजतात की नाही वाजतात, त्याबद्दल आमच्या मनात शंका आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बारूद भरून उमेदवारांना तयार ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करू, अशी टिप्पणी त्यांनी केली. त्यांच्या बारूद शब्दाचा नेमका अर्थ काय गृहीत धरावा, असा विचार सर्वच राजकीय पक्ष करू लागले आहेत.