धुळे- तो दिवस होता १० सप्टेंबर. पहाटे नेहमीप्रमाणे खासगी शिकवणीला जातो, असे सांगून तो घरातून बाहेर पडला. नंतर शिकवणी सुटून बराच वेळ होऊनही तो घरी परत न आल्याने घरातील सदस्यांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु, तो न सापडल्याने अखेर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर सुरु झाली धुळ्यातून बेपत्ता झालेल्या १५ वर्षाच्या विद्यार्थ्याचा शोध घेण्याची धुळे पोलिसांची मोहीम. आणि अखेर हा बेपत्ता विद्यार्थी मध्य प्रदेशातील पिथमपूर भागात सापडला. सहा दिवसांपासून हा विद्यार्थी त्याच्या सायकलने प्रवास करीत होता हे विशेष.

जयकुमार उर्फ साई जाधव (१५, रा.प्लॉट नं.१९, केले नगर, देवपूर, धुळे) हा १० सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजता खासगी शिकवणीला जाण्यासाठी निघाला होता. मात्र, तो तेथे न जाता घरातून निघून गेला होता. पालकांनी त्याचा शोध घेतला. परंतु, तो मिळून न आल्याने त्याच्या कुटूंबियांनी पश्चिम देवपूर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. जयकुमारच्या आईने एका चित्रफितीद्वारे आपल्या बेपत्ता मुलाचा शोध घेण्याचे आवाहन समाज माध्यमातून केले होते.

पोलिसांनीही जयकुमारचा शोध सुरु केला होता. जयकुमारने सायकलीने मध्य प्रदेशातील उज्जैनची वाट धरल्याची माहिती सीसीटीव्ही चित्रणातून पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशाकडे गेले होते. त्यांनी ठिकठिकाणच्या मंदिर परिसरातही त्याचा शोध घेतला.

तेथील सीसीटीव्ही चित्रण तपासले. परंतु, तो दर्शन घेऊन तेथूनही निघाला होता. जयकुमारने एका मालमोटारीच्या चालकाकडून मोबाईल घेऊन इंदूर येथील मामाच्या मुलाशी संपर्क साधला. मी मालमोटारीतून प्रवास करीत आहे, आता मी पिथमपूर  येथे आहे, असे त्याने सांगितले. यानंतर मामाने जयकुमार हा एका मालमोटारीत असून त्याचा आताच फोन आला होता, अशी माहिती पालकांना आणि पोलिसांना दिली. त्यामुळे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन कापडणीस यांनी तत्काळ चालकाचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला.

जयकुमारविषयी सर्व माहिती सांगून त्याला थांबवून ठेवा, आम्ही पोलीस पाठवित आहोत, अशी तंबी चालकाला भरली. यानंतर उज्जैन येथे गेलेले पश्चिम देवपूर पोलिसांचे पथक तातडीने पिथमपूर येथे पोहोचले. त्यांनी जयकुमारला ताब्यात घेतले. ही माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना आणि जयकुमारच्या पालकांना देण्यात आली. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.

सहा दिवसांपासून बेपत्ता असलेला जयकुमार जाधव हा मिळून आला आहे. सध्या तो त्याच्या नातेवाईकांकडे इंदूरला आहे. तेथे तो थोडे दिवस राहील. त्यानंतर तो धुळ्यात येईल. येथे आल्यावर त्याचा जबाब नोंदविला जाईल.  –सचिन कापडणीस (सहायक निरीक्षक, पश्चिम देवपूर पोलीस ठाणे)