अनिकेत साठे, लोकसत्ता  

नाशिक : जनतेसह पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी परस्परांशीदेखील नियमित संपर्क ठेवायला हवा. संपर्क तुटला तर राज्य हातातून निघून जाते. प्रामाणिक कार्यकर्ते, पदाधिकारी हीच आपली संपत्ती आहे. राजकारणात कधीही काहीही घडू शकते. याकडे मनसेच्या मेळाव्यात लक्ष वेधत नाशिकचे संपर्क नेते बाळा नांदगावकर आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी जनसंपर्काचे महत्त्व मांडले.

राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली. हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर नव्याने मैदानात उतरलेल्या मनसेची भाजपशी जवळीक वाढत आहे. सेनेतील बंडाळीने त्यास वेगळीच दिशा मिळू शकते. हे लक्षात घेऊन मनसेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील एकसमान नेतृत्व गुणांचे दाखले देत तेच बाळासाहेबांचे खरे वारसदार असल्याचे अधोरेखित करण्यास सुरुवात केली आहे.

पक्ष बळकट करण्यावर भर

शहरातील राजगड या पक्ष कार्यालयाच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या मेळाव्यात मनसेने बदलत्या राजकीय परिस्थितीत आपले स्थान बळकट करण्यावर भर दिला आहे. संपूर्ण राज्यात सध्या पक्षाचा एकमेव आमदार आहे. मागे मुंबई महापालिकेतील सहा नगरसेवक शिवसेनेने फोडले होते. त्याचा मनसेला  राग आहे. ती खदखद सेना आमदारांच्या बंडखोरीनंतर मुंबईत फलकांतून बाहेर आली होती. तत्पुर्वी म्हणजे नाशिक महापालिकेच्या  मागील निवडणुकीत मनसेच्या तब्बल २७ नगरसेवकांना भाजपने गळाला लावले होते. पण, त्याचे इतके शल्य आजवर वाटले नव्हते. उलट, निवडणुकीत भाजपने प्रचंड बहुमत मिळवूनही मनसे त्यांना साहाय्यकारी भूमिकेत राहिली. फोडाफोडीच्या राजकारणाची सर्वाधिक झळ बसलेला मनसे हा एकमेव पक्ष आहे. सेनेतील ताज्या बंडखोरीचे संदर्भ देत मेळाव्यात नेत्यांनी मार्गदर्शन केले.

आपण परस्परांशी प्रत्यक्ष संवाद तोडला आहे. समाज माध्यमांवर अधिक अवलंबून असतो. भोंग्याबाबत राज ठाकरे यांच्या पत्राने घरोघरी संपर्काची संधी मिळाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि राज यांचे गुण सारखेच आहेत. राज हेच खरे वारसदार असून तेच हिंदूत्वाचे विचार पुढे नेणार असल्याचे बाळा नांदगावकर यांनी नमूद केले. राज यांचे पत्र घरोघरी पोहोचवा. संघर्ष हा पक्षाचा आत्मा आहे. शिवसेनेतून बाहेर पडताना आम्ही फोडाफोडी न करण्याचे तत्त्व पाळले. गेल्या महापालिका निवडणुकीत दगाफटका झाला होता. पण आता लोकांना मनसेच्या काळात झालेली कामे समजली. त्यामुळे महापालिकेवर पक्षाचा झेंडा पुन्हा फडकवू अशी शपथ घेऊन तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी केले. प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केवळ राज हेच हिंदूत्वाचे खरे जननायक असल्याचा दावा केला. मनसैनिकाने दररोज किमान १० कुटुंबांना भेटायला हवे. एकदा यश मिळाल्यावर आम्ही झोपून घेतो. संपर्कात राहिल्यास प्रेम वाढते असे सांगत जनसंपर्क वाढविण्याचा सल्ला दिला. संपर्क राखण्याची जबाबदारी जशी पदाधिकारी आणि मनसैनिकांची आहे, तशीच ती नेतेमंडळींची आहे. तो राखला न गेल्यामुळे २०१२ च्या निवडणुकीत ४० जागा जिंकणाऱ्या मनसेची २०१७ मध्ये पाच जागांपर्यंत पिछेहाट झाली होती. पक्ष नेतृत्वाचे दुर्लक्ष, पक्षांतर्गत दुफळीवर वेळीच तोडगा न काढणे, पक्षांतर करणाऱ्यांची दखल न घेणे, विकास कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यात विलंब अशा विविध कारणांनी मनसेच्या पराभवास हातभार लावला होता. पक्ष स्थापनेवेळी संघटना बांधणीसाठी झटणारे प्रमुख नेते सेना, भाजपमध्ये निघून गेले. सत्ताकाळात महापालिकेत महत्त्वाची पदे उपभोगणाऱ्यांनी संघटना बांधणीकडे लक्षच दिले नाही. तरी त्यांना प्रदेश पातळीवरील स्थान मिळते. आता महापालिका निवडणुकीची जबाबदारी अमित ठाकरे यांच्यावर सोपविली जाणार आहे. बदलत्या राजकीय समीकरणात शिवसेनेकडून हिंदूत्वाचा मुद्दा खेचून घेण्याच्या स्पर्धेत मनसेही सहभागी झाल्याचे चित्र आहे.