जळगाव : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळावरून थेट निवडणूक आयोगाला आव्हान दिले असून, महायुतीवरही आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देखील आता आगामी निवडणुकांपूर्वी बोगस मतदार शोधून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बैठक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्ष नेते माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक तयारी आणि निवडणूक रणनिती बाबत सविस्तर चर्चा झाली. सर्व १५ तालुक्यांतील पदाधिकारी, शेतकरी सेना, महिला सेना, विद्यार्थी सेना आणि विविध अंगीकृत संघटनांचे प्रतिनिधी यांची मते जाणून घेतली गेली. आगामी निवडणुकांमध्ये मनसेची संघटनशक्ती दाखविण्याची खरी वेळ आली आहे. मनसेची ओळख म्हणजे शिस्त, प्रामाणिकपणा आणि निडरपणे सत्यासाठी उभे राहणे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मनसे हा पर्याय नाही तर गरज ठरेल, असे माजी आमदार ॲड. बाविस्कर म्हणाले.

प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील मतदार याद्यांचे व्यवस्थित अवलोकन करून घ्यावे. दुबार नावे तसेच याद्यांमधील अनियमितता शोधून काढावी. कुठे काही अनुचित प्रकार घडल्याचे लक्षात आल्यास त्याची माहिती जिल्हास्तरावर द्यावी. जिल्ह्यातील मनसेच्या रिक्त पदांची पुनर्नियुक्ती आणि आवश्यक संघटनात्मक बदल करून योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी असावी. यासाठी जिल्हाध्यक्षांनी अहवाल तयार करावा, अशा सूचना देखील माजी आमदार ॲड. बाविस्कर यांनी दिल्या. जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, अनिल वाघ, मुकुंदा रोटे आणि कमलाकर घारू यांनी आपल्या विभागातील संघटन स्थिती व निवडणूक तयारीचा आढावा सादर केला. बैठकीत प्रत्येक प्रभाग आणि तालुका पातळीवर स्वतंत्र बैठका घेऊन जनसंपर्क अभियान, युवकांचा सहभाग आणि घराघरांत मनसेचा संपर्क वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी मनसेचे उपजिल्हाप्रमुख संजय नन्नवरे, जळगाव महानगर प्रमुख विनोद शिंदे, जामनेर तालुका प्रमुख अशोक, पाटील, विशाल सोनार, भुसावळ शहर प्रमुख राहुल सोनटक्के, ज्ञानेश्वर ठाकरे, राजेंद्र लिंगायत, जळगाव शहर उपाध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार, धरणगाव शहराध्यक्ष संदीप फुलझाडे, नशिराबाद शहर प्रमुख जितेंद्र बऱ्हाटे, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक रज्जाक सय्यद, शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक अविनाश पाटील, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, कल्पेश पवार, ऐश्वर्य श्रीरामे, ॲड. सागर शिंपी मंगेश भावे, भूषण तळेराव, समाधान माळी, रामकृष्ण पवार, कन्हैया पाटील, सतीश सैंदाणे, गणेश कुंभार, अमोल माळी, विनोद पाटील, हर्षल वाणी, संदीप मांडोळे, प्रदीप पाटील, शैलेश चौधरी, भूषण ठाकरे, राहुल चव्हाण, दिनेश मराठे, पवन कोळी, महेश सुतार, चेतन नैरानी, कृष्णा धुंदुले, अरुण गव्हाणे, भूषण पाटील, भैय्या लिंगायत, प्रतीक सोनवणे, प्रतीक भंगाळे, प्रणय भागवत, वैभव सुरवाडे, दीपक सोनवणे, दशरथ सपकाळे, तुषार वाढे, अभिषेक बोरसे, रवी कोळी, करण गंगतीरे, सागर पाटील, विशाल कोळी, शुभम पाटील, वाल्मीक जगताप, सुनील माळी, महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी भील उपस्थित होत्या.