* दारणा, भावली पाठोपाठ गंगापूर, पालखेडमधून विसर्ग
* गोदावरीची पातळी वाढली
* नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरात सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दारणा, भावली पाठोपाठ सोमवारी तुडुंब भरण्याच्या मार्गावर असणाऱ्या गंगापूर, पालखेड धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. या धरणांमधून सोडले जाणारे पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीकडे मार्गस्थ होत आहे. आतापर्यंत नाशिकमधून ७२६६ दशलक्ष घनफूट अर्थात ७.२६ टीएमसी पाणी जायकवाडीला गेले. गोदावरी दुथडी भरून वाहत असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसर जलमय झाला आहे. नाशिक शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ८४ टक्के जलसाठा झाल्यामुळे दुपारी या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. साडेसहा हजार क्युसेसचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी दुथडी भरून वाहत असून सोमेश्वर धबधबा परिसरात कोसळणारे पाणी बघण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली. दारणामधून १६६८८, भावली १५०९, गंगापूरमधून ६५१० आणि पालखेडमधून ४७०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे सर्व पाणी नांदूरमध्यमेश्वरमध्ये एकत्र येते. तेथून गोदावरीच्या पात्रातून ते जायकवाडीला जाते. या बंधाऱ्यातून सध्या ५४ हजार ८४५ क्युसेसचा विसर्ग सुरू आहे. तीन दिवसांत जायकवाडीला जिल्ह्य़ातील धरणांमधून सात हजार २६६ दशलक्ष घनफूट (७.२६ टीएमसी) पाणी गेल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. गतवर्षी याच काळात १२ हजार २६४ दशलक्ष घनफूट (१२.२६ टीएमसी) पाणी गेले होते. पावसाअभावी यंदा हे प्रमाण जवळपास निम्म्याने कमी आहे.