नाशिक : दिल्ली ते नाशिक प्रवासासाठी सध्या केवळ सकाळीच विमान सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे दिल्लीला ये-जा करणाऱ्यांना परतीच्या प्रवासात अडचणी निर्माण होतात. दिल्ली विमानतळावर धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे नाशिक-दिल्ली ही सकाळची विमान सेवा दैनंदिन ऐवजी आठवड्यातून केवळ तीन दिवस चालते. ही सेवा पूर्ववत करण्यासह सायंकाळी दिल्ली-नाशिक दरम्यान दुसरी सेवा सुरू करण्यासाठी दिल्ली विमानतळावर विशिष्ट वेळ (टाईम स्लॉट) मंजूर करावी, अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे केली आहे.

नाशिकचे खासदार वाजे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री नायडू यांची दिल्लीत भेट घेतली. नाशिक विमानसेवा, ओझर विमानतळाचा विकास, कुंभमेळ्याच्या दृष्टीकोनातून नियोजन आदी विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. दिल्ली-नाशिक विमानसेवेला प्रवाशांचा प्रतिसाद आहे. व्यापारी, उद्योजक, भाविकांसाठी ती उपयुक्त ठरते. दैनंदिन असणारी ही सेवा सध्या तांत्रिक कारणास्तव आठवड्यातून तीन दिवस चालते. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही सेवा पूर्वीप्रमाणे दैनंदिन सुरू करावी. तसेच नाशिकृ-दिल्लीसाठी सायंकाळी दिल्ली-नाशिक अतिरिक्त सेवा सुरू करण्यासाठी दिल्ली विमानतळावर विशिष्ट वेळेला मान्यता द्यावी, अशी मागणी खासदार वाजे यांच्याकडून करण्यात आली.

नाशिक-दिल्ली दररोजची थांबवलेली विमानसेवा पुन्हा सुरू करणे, ओझर विमानतळाचा टर्मिनल विस्तार, नव्या धावपट्टीचे काम, कुंभमेळ्याच्या तयारीसाठी हेलिपॅड्सची गरज, आणि नव्या हवाई मार्गांची मागणी, अशा विविध बाबी मंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या. ओझर विमानतळावर एकाचवेळी एक हजार प्रवाशांची क्षमता असणारे नवीन टर्मिनल उभारणे, टॅक्सी पथ, वाहनतळासाठी अधिक जागा या प्रस्तावांना केंद्र सरकारच्या सहकार्याची आवश्यकता आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, त्र्यंबकेश्वर, नाशिक शहर आणि ओझर येथे स्वतंत्र हेलिपॅड्सची उभारणी केली जावी, अशी मागणी खासदार वाजे यांनी केली.

हवाईसेवा विस्ताराची गरज

सध्या नाशिकहून दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, हैद्राबाद या शहरांशी संलग्न विमान सेवा आहे. नागपूर आणि इंदूरची सेवा सध्या बंद आहे. हवाई सेवेच्या विस्तारासाठी नाशिकहून कोलकाता, चेन्नई, पुणे, नागपूर, वाराणसी, कोल्हापूर आदी देशातील प्रमुख शहरांसाठी नियमित उड्डाणे सुरु करण्याची मागणी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय विमान सेवेसाठी इमिग्रेशन केंद्र कार्यान्वित करण्याचा मुद्दा नागरी विमान वाहतूक मंत्री नायडू यांच्यासमोर मांडण्यात आला. यावर त्यांनी सकारात्मकता दर्शवत हे विषय संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.