जळगाव – बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणी अटकेत असलेल्या संशयित प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात मुंबईत काही गुन्हे दाखल असताना, लोढा हा यापूर्वी मंत्री गिरीश महाजन यांना पेढा भरवित असल्याचे छायाचित्र विरोधकांच्या हाती लागले आहे. त्याचा वापर करून महायुतीला कोंडीत पकडण्याची आयती संधी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी साधली असून, त्या वादग्रस्त छायाचित्राची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
जामनेर तालुक्यातील मूळ रहिवाशी असलेल्या ६२ वर्षीय प्रफुल्ल लोढा याचा मुंबईतील चकाला परिसरात चकाला हाऊस नावाने बंगला आहे. त्याच बंगल्यात त्याने एका १६ वर्षीय मुलीवर तिच्या मैत्रिणीसोबत अत्याचार केल्याचा आणि तिचे अश्लील छायाचित्र काढून ती समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिल्याचा तसेच तिला बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबईत साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, प्रफुल्ल लोढाला अटक करण्यात आली आहे. अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातही लोढा याच्या विरोधात पॉस्को, बलात्कार, खंडणीसह हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी समाज माध्यमावर एक छायाचित्र शेअर केले आहे. ज्यामध्ये प्रफुल्ल लोढा हा भाजप नेते तथा मंत्री यांनी गिरीश महाजन यांना पेढा भरवून त्यांचे तोंड गोड करताना दिसत आहे. या छायाचित्राची सीबीआय मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेची दिशाभूल करत आहेत. महाराष्ट्रात हनी ट्रॅप नावाचा कोणताच प्रकार अस्तित्वात नसल्याचा दावा ते करतात. तर मग मंत्री गिरीश महाजन यांना हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढा पेढा भरवित असतानाच्या छायाचित्राची सीबीआय चौकशी होऊ द्या. दुध का दूध पानी का पानी होईल, असेही खासदार राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित लोढा याने मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्यावर खळबळजनक आरोप केल्याचा एक वर्षांपूर्वीचा व्हिडीओ समोर आणून आमदार एकनाथ खडसे यांनीही खळबळ उडवून दिली आहे. मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर लोढा याच्या जळगाव जिल्ह्यातील संपत्तीची झाडाझडती घेण्यात आली आहे. पोलिसांनी झडतीत लॅपटॉप, पेन ड्राइव्ह आणि कुटुंबियांचे भ्रमणध्वनी जप्त केले असून, आणखी काही महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे.