नाशिक – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याची प्रत्येक तरुणाची इच्छा असते. काही जण अनेक वेळा प्रयत्न करुनही यश मिळत नसल्याने निराश होतात. काही जण मात्र जिद्द सोडण्यास तयार नसतात. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील चास या छोट्याशा गावातील रवींद्र सिंधूबाई बाळासाहेबे भाबड हे यापैकी दुसऱ्या वर्गातील म्हणावे लागतील.
एमपीएससी मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल गुरुवारी लागला. या परीक्षेत रवींद्र भाबड हे महाराष्ट्रातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. याआधी केवळ १० गुणांनी पोलीस होण्याची संधी हुकल्यावर अपयशाला हरवायचेच, ही जिद्द मानत बाळगून रवींद्र भाबड यांनी पुन्हा परीक्षेची तयारी केली. आणि एक यशोगाथा जन्माला आली.
सिन्नर तालुक्यातील चास हे छोटेसे गाव. भाबड यांचे प्राथमिक शिक्षण चासमधीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण भोजापूर खोरे हायस्कूल (चास) येथे झाले. घरची आर्थिक परिस्थिती नाजकू. त्याची जाणीव भाबड यांना शिक्षण घेतानाच होती. घर चालविण्यासाठी आई-वडिलांना मोलमजुरी करणे भाग पडले. मोलमजुरी करुनच त्यांनी रवींद्र आणि त्यांच्या दोन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षा हा ध्यास घेतल्याने त्यांनी महाविद्यालयीन टप्प्यावर कला शाखा निवडली. महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी काही लहानसहान कामेही केली. काही मित्रांनीही त्यांना मादत केली.
रवींद्र यांनी प्रारंभी पोलीस भरतीची तयारी केली. २०१४ मध्ये केवळ १० गुणांनी त्यांचे पोलीस दलात जाण्याचे स्वप्न भंगले. त्यानंतर त्यांनी २०१५ पासून एमपीएससीची तयारी सुरु केली. जाणीवपूर्वक आपण एमपीएससीचा खडतर मार्ग निवडल्याचे ते सांगतात. एमपीएससीमध्ये यश मिळवायचे असेल तर पुणे या शिक्षणाच्या माहेरघरी जाण्याशिवाय गत्यंतर नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी नाशिक जिल्हा सोडला. पुणे गाठले. एमपीएससीच्या तयारीत झोकून दिले. प्रारंभी काही प्रयत्नांत त्यांना यश आले नाही. परंतु, ते जिद्दीने अभ्यास करीत राहिले.
२०१९ मध्ये स्पर्धा परीक्षेतूनच नायब तहसीलदार म्हणून निवड झाली. परंतु, त्याचवेळी करोनाने थैमान घातले. त्यामुळे त्यांना २०२२ मध्ये नोकरीवर रुजू होण्याचे आदेश मिळाले. परीक्षा देणे सुरुच ठेवले. एप्रिल २०२५ मध्ये गटविकास अधिकारी म्हणून निवड झाली. परंतु, ध्येय उपजिल्हाधिकारी होण्याचे ठेवले होते. आणि अखेर ते पूर्ण केलेच.
एकाचवेळी सर्व परीक्षांवर लक्ष देण्याऐवजी एकाचेच ध्येय ठेवा, असे रवींद्र भाबड सांगतात. प्रारंभी काही प्रयत्नांत अपयश आल्यानंतरही प्रत्येकवेळी त्यांनी अपयश का आले, त्याचे विश्लेषण केले. ज्या त्रुटी आढळल्या, त्या दूर केल्या. अपयश म्हणजे शेवट नाही, ती पुढच्या प्रयत्नाची सुरुवात असते, असे ते म्हणतात. गरिबी कधीच शाप ठरली नाही. गरीबी ही शिक्षकासारखी असते. ती वास्तवाची जाणीव करुन देते. सातत्य ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि अडचणींना आपले मित्र बनवा, असा सल्ला ते युवकांना देतात. आपली गरीबी हेच आपले सर्वात मोठे बळ ठरली, असे ते सांगतात.
