नाशिक : लासलगावजवळ एका गल्लीतील दादागिरी करणाऱ्याने आपला वाढदिवस भर रस्त्यात साजरा करणे सुरू केले असता एका वाहनचालकाने भोंगा वाजवला. याचा राग आल्याने टोळक्याने वाहनचालकाचा धारदार शस्त्राने वार करत खून केला. याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मंगळवारी सायंकाळी लासलगाव परिसरात राहणारे आकाश शेजवळ आणि चेतन बैरागी हे कारमधून कामानिमित्त बाहेर पडले. पिंपळगावजवळ असलेल्या इंदिरानगर भागात ते आले असता भर रस्त्यात संशयित साहिल इमरान शेख हा टवाळखोर मित्रांसोबत वाढदिवस साजरा करत होता. या ठिकाणी शारीरिक अंतर, मुखपट्टी असे कुठेलच निकष न पाळता चौकात गर्दी झाली होती. ही गर्दी हटविण्यासाठी आकाश यांनी वाहनाचा भोंगा वाजवला. याचा संशयित साहिल आणि त्याच्या समर्थकांना राग आला. त्यांनी आकाश यांचे वाहन थांबवीत धारदार शस्त्राने आकाशवर वार केले.
आकाशला मदत करण्यासाठी चेतन हा त्या टोळक्याकडे येत असताना साहिल शेख, फिरोज शहा, इम्रान सय्यद, कृष्णा, रोहित शिरसाठ, अरुण माळी, राजू राजुळे, काळू लहाने, दत्तू जाधव यासह अन्य दोन ते तीन जणांनी चेतन यास जबर मारहाण केली. धारदार शस्त्राने वार केल्याने चेतनचा मृत्यू झाला. लासलगाव पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल असून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
लासलगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आकाश आणि चेतन या दोघांनी मद्यपान केले होते, असे सांगितले. वाढदिवस साजरा करणारे हे मुंबई येथे कांदा वाहतूक करणाऱ्या वाहनावरील चालक आहेत. या सर्वानी मद्यपान केले होते. भोंगा वाजविण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान खुनात झाले. जखमी आकाशची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.