नाशिक : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील विविध प्रभागात इच्छुकांनी दीपावली पाडवा आणि भाऊबीज निमित्त संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करीत प्रचाराची संधी साधली. नाशिक मध्य विधानसभेच्या आमदार देवयानी फरांदे यांनी देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रमोद महाजन उद्यानात भाऊबीज पहाट कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या सुरांनी रसिकांची दिवाळी सुरेल झाली. या कार्यक्रमातून आ. फरांदे यांनी मुलगा अजिंक्यला महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची जोरदार तयारी सुरू केल्याचे अधोरेखीत झाले.
महानगरपालिका निवडणुकीमुळे यंदा नाशिककरांची दिवाळी सुरेल झाली. वेगवेगळ्या प्रभागात इच्छुकांनी प्रसिद्ध गायकांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या माध्यमातून इच्छुकांनी प्रचाराची संधी साधली तर, काहींनी राजकीय नेतृत्व पुढील पिढीकडे सोपविण्याची तयारी केली. नाशिक मध्य विधानसभेच्या सलग तिसऱ्यांदा आमदार बनलेल्या देवयानी फरांदे या आधी महानगरपालिकेत नगरसेविका म्हणूनही कार्यरत होत्या.
उपमहापौरपदी त्यांनी काम केले. आ. फरांदे यांच्यातर्फे दरवर्षी दिवाळीत भाऊबीट पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गुरुवारी पहाटे प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नुतनीकरण झालेल्या प्रमोद महाजन उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमातून आ. फरादे यांनी मुलगा अजिंक्यला राजकीय क्षेत्रात पुढे आणण्याचे पुरेपूर नियोजन केल्याचे दिसून आले.
आपल्या आमदारकीच्या काळात मतदारसंघात सर्वत्र विविध प्रकल्प साकारले. आपल्या प्रभागात छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव एक नोव्हेंबर रोजी सुरू होत असल्याचे अजिंक्यने म्हटल्याचा दाखला आ. फरांदे यांनी भाषणात दिला. छोटा भीम संकल्पनेवर आधारीत प्रमोद महाजन उद्यानात ५० हजार चौरस फूट हिरवळ, ३५०० विविध प्रकारची झाडे, भ्रमंतीसाठी ट्रॅ्क, खेळणी आणि बालगोपाळांच्या सुरक्षेसाठी जमिनीवर खास रबर सोलिंगचे आच्छादन अशा अनेक नाविण्यपूर्ण कल्पना मूर्त स्वरुपात आणल्या गेल्या.
या उद्यानाची काळजी पती सुहास फरांदे हे घ्यायचे. उद्यानाचे नुतनीकरण सुरू असताना चिरंजीव अजिंक्यने लक्ष देऊन बारीकसारीक गोष्टी ठेकेदाराकडून करून घेतल्या. यामुळे प्रमोद महाजन उद्यानाने कात टाकल्याकडे लक्ष वेधत आमदार फरांदे यांनी उद्यानाचे संपूर्ण श्रेय मुलगा अजिंक्यला दिले. पती आजारी पडल्यानंतर आपल्या व्यस्त दिनक्रमात जनसंपर्काची कामे मुलगा अजिंक्य सांभाळतो. अतिशय बारकाईने तो अनेक कामात लक्ष ठेवतो. सूचना करतो.
उद्यान निर्मितीत त्याने संपूर्ण लक्ष ठेवल्याने अपेेक्षित असे उद्यान तयार झाले. या उद्यान निर्मितीत त्याचे योगदान आहे. प्राध्यापिका असल्याने खोटे कौतुक करता येत नाही असे सांगत आमदार देवयानी फरांदे यांनी मुलगा अजिंक्यचे कौतुक केले. अजिंक्य फरांदे हे सध्या भाजयुमोचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. महापालिकेत ज्या भागाचे आ. देवयानी फरांदे यांनी पूर्वी प्रतिनिधित्व केले होते, त्याच प्रभाग सातमधून मुलगा अजिंक्यला रिंगणात उतरवण्याची मुहूर्तमेढ या माध्यमातून रोवली गेली.