मनमाड – शहरापासून चार किलोमीटर असलेल्या अंकाई-टंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी अनकवाडे शिवारात शेतात मोठे भगदाड आढळून आल्याने खळबळ उडाली. किल्ल्यावर जाण्यासाठी पूर्वीच्या काळी अशा प्रकारे भुयारी मार्ग तयार केलेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याबाबत माहिती समजताच मनमाडच्या तलाठी प्रतिभा नागलवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच वरीष्ठ कार्यालय आणि पुरातत्व विभागाला यासंबंधी माहिती दिली. आता पुरातत्व विभागाचे अधिकारी येऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हे भगदाड नेमके काय आणि कसले, याचा उलगडा होईल.

हेही वाचा – धुळे शहरात मुलांनी विनापरवाना वाहन चालविल्यास पालकांना दंड

मनमाड- येवला रस्त्यावर अनकवाडे शिवारात शेतकरी जमिनीची नांगरणी करत असताना अचानक नांगराचा फाळ अडकला. त्याठिकाणी मोठे भगदाड असल्याचे निदर्शनास आले. शेतात मोठे भुयार आढळून आल्याची वार्ता सर्वत्र पसरली. बघ्यांची एकच गर्दी झाली. हा प्रकार नेमका काय आहे, याबद्दल गूढ वाढले आहे. येथून जवळच अंकाई-टंकाई हे किल्ले आहेत. या किल्ल्यांवर जाण्यासाठी पूर्वीच्या काळी अशा प्रकारे रस्ता बनविलेला असावा, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – नाशिक पोलिसांची ३१ डिसेंबरसाठी सज्जता; वाहन तपासणीसह हाॅटेल, ढाब्यांवर नजर

दरम्यान, अंकाई-टंकाई किल्ला १३ व्या शतकात बांधल्याचे सांगितले जाते. अंकाई आणि टंकाई हे एकमेकांना खेटून असणारे किल्ले आहेत. अंकाई किल्ला धार्मिक स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. अगस्ती ऋषींनी या ठिकाणी तप केल्याची आख्यायिका आहे. दुर्गप्रेमींची कायमच या दोन्ही किल्ल्यांना पसंती असते. मुंबई, पुणे, कोल्हापूरसह राज्यातील विविध भागांतून इतिहासप्रेमी या किल्ल्यांना भेट देण्यासाठी येत असतात.