लोकसत्ता वार्ताहर

मनमाड – महाराष्ट्रातील श्रीमंत ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या नांदगाव तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतीला आय.एस.ओ.९००१ सन २०१५ हे गुणवत्ता नामांकन व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यामुळे नागापूर ग्रामपंचायतीच्या नावलौकिकात भर पडली आहे.

तेल कंपन्यांचे डेपो या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्यामुळे ग्रामपंचायतीला मोठा कर मिळतो. गुणवत्ता नामांकनासाठी लोकनियुक्त सरपंच राजेंद्र पवार यांनी पाठपुरावा केला. २००३ मध्ये या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा कार्यभार पवार यांनी स्वीकारला. तेल कंपन्यांकडून ग्रामपंचायतीला मिळणारा निधी अतिशय कमी होता. प्रयत्नांची पराकाष्टा करून, शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करून, प्रसंगी न्यायालयात जाऊन कर वाढवण्याचे काम त्यांनी केले. हा निधी मोठ्या प्रमाणावर गावासाठी उपलब्ध करून दिला. यामुळे गावाचा कायापालट झाला. अनेक लहान-मोठी विकासाची कामे झाली. या गावाचे नाव जिल्हा व राज्याच्या नकाशावर अग्रक्रमाने घेतले जाते.

आणखी वाचा-EVM बद्दल शंका आहे का? साशंकता दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाची प्रात्यक्षिके

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावात कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत. याची दखल शासनस्तरावर घेतली गेली. याचीच पावती म्हणून महाराष्ट्राचा सर्वात मोठा व महत्वपूर्ण असा निर्मल ग्राम पुरस्कार, देशाचा सर्वोच्च असा राष्ट्रपती पुरस्कार या गावाला मिळाला. २० वर्षानंतर पुन्हा एकदा लोकनियुक्त सरपंच झाल्यानंतर पवार यांनी वाढीव कर मिळवून गावातील उर्वरित कामे करण्यावर लक्ष केंद्रीत केले. याच घटनाक्रमात ग्रामपंचायतीला आय.एस.ओ.- ९००१ सन २०१५ हे गुणवत्ता नामांकन प्राप्त झाले आहे गावासाठी व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी तो अभिमानाचा विषय ठरला. नांदगाव तालुक्यात हे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळवणारी ही पहिलीच ग्रामपंचायत आहे.